लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अमेरिकेहून थेट भारतात दाखल झालेल्या मक्यावरील लष्करी अळीचे संकट टाळण्यासाठी मे महिन्यापासून प्रयत्नशील असलेल्या कृषी खात्याच्या अथक प्रयत्नानंतरही अळीचा प्रभाव झपाट्याने होत असल्याने कृषी खाते हतबल झाले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरहून अधिक हेक्टरवर मक्याचे पीक घेतले जात असताना त्यातील जवळपास ६० टक्के क्षेत्राला लष्करी अळीचा धोका निर्माण झाल्याने यंदा मक्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे.
काही वर्षांपूर्वी मक्याला बोेंडअळीने त्रस्त केले होते त्यावर कृषी विभागाने कसेबसे नियंत्रण मिळविल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मक्याची निर्यातही करण्यात आली. यंदा मात्र मक्याची पेरणी करण्यापूर्वीच अमेरिकन लष्करी अळीचा धोका भारतातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला. नाशिक जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी होते त्यांनी मार्च, एप्रिल महिन्यांत मक्याची पेरणी केली होती. त्यांना मात्र अवघ्या महिनाभरात लष्करी अळीच्या धोक्याला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र खरिपाच्या पेरणीत सर्वच ठिकाणी लष्करी अळीने आपले कार्यक्षेत्र विस्तारले. अवघ्या वीस दिवसांच्या प्रजनन काळात लष्करी अळी किमान दोन हजारांच्या आसपास अंडी घालत असून, तीन दिवसांनंतर तत्काळ अंडीतून अळी बाहेर पडून ती थेट पिकाच्या मुख्य गाभावर हल्ला चढविते, परिणामी पीक आहे त्या परिस्थितीतच खुंटते. या अळीचा प्रवासही वेगाचा असल्यामुळे एका शेतातून दुस-या शेतात जाण्यास काही मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे कृषी खात्याने मे महिन्यापासून म्हणजे खरिपाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांना लष्करी अळीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांशी अवगत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याचबरोबर अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चुना व वाळूचा वापर करण्याचा तसेच अळीला दुसºया पिकाकडे वळविण्यासाठी विविध प्रयोग केले. परंतु त्याला फारसे यश मिळू शकलेले नाही.जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख दहा हजार मक्याचे क्षेत्र असून, शेतकºयांनी सर्वच क्षेत्रांत मक्याची पेरणी केली आहे. त्यातील सुमारे ६० टक्के क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला असून, त्यावर कोणतीही मात्रा लागू पडत नसल्याचे पाहून अखेरचा उपाय म्हणून रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा पर्याय पुढे आला आहे. परंतु ही फवारणी महागडी आहे.