नाशिक- राज्याचे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी तीस वर्षांपूर्वी खोटी माहिती देऊन सदनिका घेतल्या प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिल्यानंतर त्यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा होत आहे. मात्र, नाशिकचे माजी सरकारी वकील श्रीधर माने यांनी कायदेशीर मार्गाचा विचार केला तर ॲड. कोकाटे यांना अपिलाची संधी असल्याने तूर्तास कोणताही धोका नसल्याचे मत व्यक्त केले.
ॲड. श्रीधर माने यांनी ॲकेडमीक माहिती देताना सांगितले की, कलम ४२०, ४६५,७१ आणि ७४ या कलमान्वये दाखल खटल्यात त्यांना शिक्षा झाली आहेे मात्र,ही शिक्षा कनिष्ठ न्यायालयात झाली आहे. तरतूदीनुसार अशा न्यायालयात तीन वर्षे शिक्षा झाल्यास त्यांना आपल्या शिक्षेचे आदेश तात्पुरते स्थगित किंवा निलंबीत करता येतात. त्याच प्रमाणे ते संबंधीत आरोपीला जामिन मंजूर करू शकतात. त्यानंतर त्यांना संबंधीतांना तातडीने न्यायलयीन निर्णयाची प्रत द्यावी लागते. माझ्या माहिती नुसार ही कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे कृषी मंत्री कोकाटे हे आता जिल्हा सत्र न्यायालयात निर्णयाला आव्हान देऊ शकतात. तेथे त्यांच्या विरेाधात निकाल गेलाच तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत अपिल करून केस लढता येते. त्यामुळे लगेचच त्यांच्या आमदारकीवर परीणाम होईल असे वाटत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.