सिन्नर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वतयारी सुरू केली असून कृषी विभागाकडूनदेखील व्हॉट्सॲप, यू-ट्युब, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांच्या मदतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधता येत नाही, तसेच शेतकरी समूह संघटन करून मोठ्या प्रमाणावर मेळावे, सभा, बैठका घेण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे या समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करून घेतला जात आहे. शिवाय, कृषी कर्मचारी शेतकऱ्यांशी थेट संपर्क करून विभागाच्या मोहिमा आणि योजनांचा प्रचार-प्रसार करत आहेत. याची पडताळणी करण्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी सिन्नर तालुक्यातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सिन्नर तालुक्यातील मोह येथील अरुण भिसे, सुनील भिसे यांच्या शेतावर जाऊन पडवळ यांनी घरगुती वापरावयाच्या सोयाबीन बियाणांची उपलब्धता तपासली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पडवळ आणि निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ यांनी गुगल मीटच्या माध्यमातून प्रक्षेत्र स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधला. तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, मंडळ धनंजय वार्डेकर, संजय पाटील, महेश वेठेकर यावेळी उपस्थित होते.
--------------------------
छापील किमतीत खते खरेदी करा
रासायनिक खतांच्या किमतीबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यास उत्तर देताना तालुका कृषी अधिकारी गागरे यांनी सांगितले की, रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून खतांच्या पिशवीवरील छापील किमतीस खते खरेदी करावीत. जर कोणी विक्रेते जादा दराने खते विक्री करत असल्यास किंवा खतांची कमतरता असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन गागरे यांनी केले.
-----------------
नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी सिन्नर तालुक्यातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. (२७ सिन्नर १)
===Photopath===
270521\27nsk_4_27052021_13.jpg
===Caption===
२७ सिन्नर १