सात ते आठ वर्षांपासून शरद आहेर शहराध्यक्षपद सांभाळात आहेत. त्याआधी पक्षात दोन गटांमुळे समांतर काँग्रेसचे राजकारणदेखील रंगले होते. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची बिकट अवस्था झाली होती. महापालिकेत एकेकाळी सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाची शहरातील अवस्था क्षीण होत गेली. चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पक्षाचे अवघे सहा नगरसेवक निवडून आले होते. तेही दोन प्रभागात मनसे आणि अपक्षांशी युती करून निवडले गेले. त्यावेळीच आहेर यांना बदलणार असल्याची चर्चा होती. परंतु चार वर्षे निघून गेले आता पुन्हा वर्षभरावर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्यातच राज्यात काँग्रेस नेतृत्वाने फेरबदल केले असून, बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी नानासाहेब पटोले यांची वर्णी लागताच प्रदेश कार्यकारिणीत बदल झाले असून, प्रदेश उपाध्यक्षपदी शरद आहेर यांची वर्णी लागल्याने त्यांचे शहराध्यक्षपद बदलण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
शहराध्यक्षपदासाठी डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, शैलेश कुटे, भरत टाकेकर यांच्यासह अन्य काही नावे चर्चेत आहेत. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.