नाशिक : राज्यातील अनेक भागात विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता नाशिकमधील स्थगित झालेली विमानसेवा बुधवार (दि.२७)पासून सुरू होणार आहे. अर्थात, ही सेवा सुरू झाल्यानंतर नाशिकमध्ये येणाऱ्या प्रवाशांना मात्र, चौदा दिवस क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे.केंद्राच्या उडान योजनेच्या दोन टप्प्यात नाशिक ते पुणे, नाशिक ते हैदराबाद आणि अहमदाबाद अशा तीन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होती. मात्र मार्च महिन्यात लॉकडाउनमुळे ती स्थगित करण्यात आली. देशांतर्गत विमानसेवा गेल्या सोमवारी (दि.२५) सुरू झाल्या असल्या तरी राज्यातील अनेक शहरांना जोडणारी सेवा मात्र सुरू होऊ शकलेली नाही. अहमदाबादसाठी दोन कंपन्या सेवा देतात त्यातील ट्रु जेटने २५ मेपासून सेवा सुरू करण्यासाठी बुकिंग सुरू केले होते. मात्र नंतर ते स्थगित केले. आता मात्र बुधवार (दि.२७)पासून ही सेवा सुरू होणार आहे. अहमदाबाद येथून सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी विमान निघेल आणि नाशिकमध्ये रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल तर रात्री साडेआठ वाजता निघून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहोचेल.
...अखेर आजपासून होणार अहमदाबाद विमानसेवेचे ‘उडान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:35 AM