नाशिक : नाशिक शहराचेचे भूमिपुत्र भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांडलकर यांना प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर शौर्यचक्र जाहिर करण्यात आले आहे. झारखंडच्या त्रिकृट पर्वतरांगेत झालेल्या रोपवेच्या दुर्घटनेत ३५पर्यटकांचे प्राण वाचविण्यास कमांडिंग ऑफिसर कॅप्टन योगेश्वर यांच्या पथकाला यश आले होते. तेव्हा ते कोलकाताच्या बारकपुर येथील वायुसेनेच्या केंद्रात कार्यरत होते.
झारखंड राज्यातील देवघर येथील त्रिकुट डोंगरावरील रोप-वेची दुर्घटना मागील वर्षी एप्रिल महिन्यात घडली होती. तेव्हा अडकलेल्या पर्यटकांना वाचविण्यासाठी भारतीय वायुसेनेचीही आपत्कालीन मदत घेण्यात आली होती. तेव्हा ४६लोकांचे प्राण वाचविण्यास बचावकार्य करणाऱ्या पथकांना यश आले होते. यावेळी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे कॅप्टन योगेश्वर यांनी केलेल्या अतुलनीय धाडसी बचाव कार्याची दखल घेत त्यांना शाैर्यपदक जाहिर करण्यात आल्याची घोषणा भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांनी केली. त्यांनी या बचाव मोहिमेत सुमारे ३५ पर्यटकांना सुरक्षितरित्या रेस्क्यू केले होते. हे देशातील तीसरे शांतताकालीन शौर्य पदक आहे. बचावकार्य मोहिमेचे नेतृत्व कॅप्टन योगेश्वर हे करत होते. यावेळी त्यांच्या पथकाने एमआय१७ व्ही५ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पर्यटकांना सुरक्षितरित्या एअरलिफ्ट केले होते.
अचूक नियोजनामुळे १५००फूट उंचीवर लटकत असलेल्या दुर्घटनाग्रस्त रोप-वेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे आव्हानात्मक काम वायुसेनेच्या पथकासमोर होते. यावेळी बारकाईने केलेला परिस्थितीचा अभ्यास व सुक्ष्म नियोजनामुळे ही बचावमोहीम यशस्वी करु शकलो असे कॅप्टन योगेश्वर यांनी सांगितले. ते मुळ नाशिकचे असून त्यांनी माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण ओझर टाऊनशिपच्या विद्यालयात घेतले आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचेही ते माजी विद्यार्थी आहेत.