नाशिक : केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत येत्या शनिवारपासून सुरू होणाºया विमानसेवेची सज्जता सुरू झाली आहे. एअर डेक्कनच्या विमानाचे सायंकाळी ओझर येथे आल्यानंतर स्वागत करण्यात येणार आहे तर त्यानंतर सायंकाळी नाशिकहून पुण्यासाठी विमान रवाना होताना पालकमंत्री गिरीश महाजन हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या सेवेसाठी नागरिकही उत्सुक असून, त्यामुळेच ३ जानेवारीपर्यंत तिकिटे विकली गेली आहेत.नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची उद्योजक आणि व्यावसायिकांची मागणी होती. नाशिकच्या विकासाला पोषक ठरू शकणारी ही मागणी केंद्र सरकारच्या वतीने प्रादेशिक विमानसेवेसाठी आखलेल्या उडान योजनेअंतर्गत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने विमान कंपन्यांना आर्थिक मदत करण्याचे (पन्नास टक्के तिकिटांसाठी अनुदान) धोरण आखल्याने कंपन्यांना तोटा होणार नाही. त्यामुळे यापूर्वी याच कारणावरून विमानसेवा बंद पडण्याचा अनुभव असला तरी ही सेवा अखंडितपणे सुरू राहील, असा विश्वास नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी व्यक्त केला. एअर डेक्कनच्या वतीने नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशी सेवा येत्या शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय सज्जतेची माहिती दिली. २३ तारखेला सायंकाळी ५.१० वाजता मुंबईहून निघणारे विमान सायंकाळी ६ वाजता ओझर विमानतळावर आल्यानंतर तेथे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. याठिकाणाहून सायंकाळी ६.२० मिनिटांनी विमान पुण्याला रवाना होईल त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.या कार्यक्रमांना दोन्ही खासदार, जिल्ह्यातील आमदार, महापौर तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच निमा, आयमा अशा सर्व उद्योग संघटनांना निमंत्रित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सुरुवातीला १८ सीटचे छोटे विमान असणार असून, कंपनीला मिळणाºया प्रतिसादानंतर मोठे चाळीस सीटर विमान आणू शकते, असेदेखील गोडसे आणि राधाकृष्णन् यांनी सांगितले. या विमानसेवेसाठी सध्या महामार्गानंतर विमानतळाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून, तेथे जाण्यासाठी विलंब होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत असल्याने लवकरच रुंदीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
विमानसेवेची सज्जता : आता देशांतर्गत सेवेसाठी प्रतीक्षा नाशिकला स्वागत, पुण्यासाठी हिरवा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:38 AM