नाशिक : शहरात या आठवड्यात व्हीआयपी, व्ही.व्ही.आय.पी. दर्जाच्या व्यक्तींचे संभाव्य दौरे लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने चोख नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुन्हे विशेष शाखेचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी कलम १४४ लागू करण्यात आला असून, सर्व प्रकारच्या हवाई साधनांना ‘आकाशबंदी’ करण्यात आल्याचा आदेश जारी केला आहे.शहरात आगामी काही दिवसांमध्ये अतिमहत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे दौरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच उपाययोजनांवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. कुठल्याहीप्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नाही म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. पाटील यांनी या पार्श्वभूमीवर कलम १४४ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या हवाई साधनांना पोलीस आयुक्तालय हद्दीत निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅँग ग्लायडर्स, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलुन्स, खासगी हेलिकॉप्टर्स, ड्रोन यांसारख्या विविध हवाई साधनांच्या उड्डाणावर येत्या शुक्रवारी (दि.२०) मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आल्याचे मनाई आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.महत्त्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या थांबण्याच्या ठिकाणांना संवेदनशील भाग म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या विशेष दर्जाच्या व्यक्तींचे हेलिपॅडची जागा तसेच रस्ता मार्ग परिसरात कुठल्याही प्रकारच्या हवाई साधनांचा वापर करता येणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. या आदेशाविरुद्ध कृती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तसे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.—इन्फो—पूर्वपरवानगी आवश्यकमहत्त्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौºयाच्या कालावधीत ड्रोनद्वारे हवाई चित्रीकरण एखादी व्यक्ती, संस्था, शासकीय आस्थापनांना करावयाचे असल्यास त्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासनाकडून परवानगी न घेता हवाई साधनांचा विशेषत: ड्रोनचा वापर चित्रीकरणाच्या कारणासाठी केल्यास संबंधितावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मनाई आदेशात (कलम-१४४) स्पष्ट करण्यात आले आहे.
हवाई साधनांना ‘आकाशबंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 1:53 AM