सालाबादप्रमाणे यंदाही ६ डिसेंबर या तारखेच्या औचित्यावर शहरात रझा अकादमीसारख्या काही धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील मशिदींमध्ये मोजक्याच संख्येने दुपारी एकत्र येत सामूहिकरीत्या अजान दिली.
जुने नाशिक परिसरातील शहीद अब्दुल हमीद चौक, बडी दर्गा शरीफ भाग, चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, नानावली, नाईकवाडीपुरा, काझीपुरा, मोहम्मद अली (वडाळा) रोड, आयशा मशीद परिसर, खडकाळी, कोकणीपुरा, या भागांमधून सातत्याने सुमारे पाच मिनिटे तीन वेळा अजानचा आवाज कानी पडला. दरम्यान, भद्रकाली, इंदिरानगर, मुंबईनाका पोलिसांच्यावतीने जुने नाशिक, भाभानगर, वडाळा रोड, वडाळागाव भागात रविवारी सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तसेच नियमित गस्तीमध्येही वाढ करण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वीच शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी, एजाज रझा मकरानी, हाजी जाकीर अन्सारी आदींच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी मुस्लीम धर्मगुरू व विविध धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत शांततेत व कोविड-१९ च्या नियमावलीचा भंग न करता अजानचा कार्यक्रम आटोपशीर घेण्याची सूचना केली होती. यानुसार समाजबांधवांनी केवळ मशिदींमधून अजान दिली.