शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

आजीबाईंनी काढलं पुस्तकांचं हॉटेल!

By मिलिंद कुलकर्णी | Updated: October 1, 2023 06:44 IST

कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रम तिथे होऊ लागले आहेत.

मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी संपादक, नाशिक

राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची भूक भागविण्यासाठी लहान-मोठी अनेक हॉटेल आहेत. गमतीदार नावांचे अमृततुल्य चहा विक्री करणारे हॉटेलदेखील लक्ष वेधून घेतात; पण ‘पुस्तकांचं आजीचं हॉटेल’ हे नाव वाचल्यावर उत्सुकता चाळवली जाते आणि पावले आपोआप हॉटेलकडे वळतात. मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्याकडे जाताना नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर दहावा मैल येथे हे हॉटेल आहे. समाज व प्रसारमाध्यमांमुळे आता बऱ्यापैकी चर्चा झालेली असल्याने हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी असते. इतर हॉटेलांसारखेच टेबल, खुर्च्या असल्या तरी लक्ष वेधले जाते ते ठिकठिकाणी असलेल्या पुस्तकांकडे.

प्रत्येक टेबलवर असलेली पुस्तके, टेबलशेजारी असलेल्या स्टँडवर मांडलेली पुस्तके, शेजारच्या हॉलमध्ये मोठ्या टेबलवर प्रदर्शित केलेली अनेक पुस्तके, अक्षरचित्रकाव्यांनी नटलेली कवितेची भिंत, साहित्य अकादमीसह प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेल्या नाशिककर साहित्यिकांच्या छायाचित्रांची भिंत, वाचनाचा आनंद घेत बसलेले खवय्ये, हे सुखद चित्र दिसते. स्वागताला आजीबाई पुढे येतात. नऊवारी पातळ, कपाळावर रुपयाएवढे कुंकू, करारी बाणा, अशा भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या आजीच्या चेहऱ्यावर पाहुण्यांच्या स्वागताचा आनंद ओसंडून वाहत असतो. प्रेमाने स्वागत करणाऱ्या याच त्या हॉटेलच्या मालकीण आजीबाई, म्हणजे भीमाबाई संपत जोंधळे. अवघ्या पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या या आजीबाई ७३ वर्षांच्या आहेत. मुलगा प्रवीण आणि सून प्रीती यांच्या मदतीने त्या हे हॉटेल चालवतात. आजींच्या हातचं पिठलं - भाकरी, शेवभाजी हे पदार्थ लाजवाब आहेत. प्रत्येक ग्राहकाची व्यक्तिगत विचारपूस त्या करतात. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरून प्रवासी आवर्जून भेट देतात. अनेक साहित्यिक येऊन आजीबाईचे हे हॉटेल बघतात. कौतुक करत असताना काही सूचना करतात, त्याची अंमलबजावणी आजीबाई लगेच करतात. त्यामुळे प्रत्येक भेटीत तुम्हाला नवीन काही तरी बघायला मिळते. हॉटेलच्या मागील बाजूला सोफे, झोपाळे असून झाडांच्या सावलीत तुम्ही निवांत पुस्तके वाचत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. हॉटेलच्या गच्चीवर छोटेखानी कार्यक्रम घेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन असे कार्यक्रम तिथे होऊ लागले आहेत.

भीमाबाई या मूळच्या शेतकरी. नाशिक जिल्ह्यातील जऊळके शिवारात दहा एकर शेती होती. रासायनिक उद्योगामुळे जमीन नापीक झाली. घर, शेती विकून स्थलांतर करावे लागले. चहाच्या टपरीपासून सुरुवात केली. त्यासोबत वर्तमानपत्रांची एजन्सी घेतली. इथून भीमाबाईंचे वाचनसंस्कृतीशी नाते जडले. टपरीशेजारी वर्तमानपत्र वाचनासाठी स्टँड उभारला. दहा वर्षांनंतर हॉटेल सुरू केले. लोक हॉटेलमध्ये येत आणि खाद्यपदार्थ येईपर्यंत मोबाइलमध्ये गुंग होत. हे आजीबाईंना खटकत होते. त्यातून पुस्तकांची कल्पना सुचली. मुलाला सांगून घरातील पुस्तके आणून टेबलवर ठेवली. तुम्ही हॉटेलमध्ये या, पुस्तके वाचा. कितीही वेळ बसा, असे आजीबाईंचे सांगणे असते. हॉटेलमध्ये येऊन काही खाल्ले नाही तरी चालेल; पण या आणि वाचा, या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपल्याकडील पुस्तके भेट दिली. काही साहित्यिकांनी पुस्तकांच्या प्रती पाठवल्या. आज मोठा संग्रह तयार झाला आहे. हॉटेलमध्ये होणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी लोकांना आजी पुस्तके भेट देतात.

शाळांमध्ये वाचन चळवळ वाढावी, म्हणून स्वत: जाऊन मुलांना पुस्तके भेट देतात. रुग्णालयांमध्ये फळांच्या टोपलीऐवजी पुस्तकांची टोपली भेट देतात. वाचनालये, आश्रमशाळांना पुस्तके भेट देत असतात.

स्वत: अल्पशिक्षित असल्या तरी आजींनी मुलगी आणि मुलगा अशा दोघांना उच्चशिक्षण दिले. मुलगा प्रवीण हा पत्रकार, साहित्यिक व प्रकाशक आहे. आजींच्या सूचनेनुसार तो पुस्तकांचे हॉटेल फुलवत आहे. स्वत: आजींचा दिवस पहाटे ४ वाजता सुरू होतो.

वर्तमानपत्रांचे गठ्ठे ताब्यात घेण्यापासून तर हॉटेलमधील स्वयंपाक, व्यवस्थापन हे सगळे स्वत: बघतात. खाद्य व वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांच्या कार्याची दखल वेगवेगळ्या संस्थांनी घेतली. एकदा तरी आजीला भेटायला आणि तिचे पुस्तकांचे हॉटेल नक्की पाहायला हवे.