Ajit Pawar NCP ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला गळती लागली असून एकामागोमाग एक नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरू लागले आहेत. अशातच अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत. कारण राष्ट्रवादीचे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या निष्ठावान संवाद मेळाव्यास उपस्थित राहिले आहेत. तसंच माझी निष्ठा शरद पवार यांच्यावर असल्याचंही गोकुळ झिरवळ यांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना गोकुळ झिरवळ म्हणाले की, " आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना निवडून आणले. कार्यकर्त्यांची इच्छा होती की, आपण भास्कर भगरे यांच्याबरोबर राहायला हवे. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता. माझ्या वडिलांची निष्ठा अजित पवारांवर आहे. कुटुंब व्यवस्था वेगळी आणि राजकारण वेगळं आहे. त्यांची अजित पवार यांच्यावर आणि माझी शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे. मात्र माझ्या वडिलांनीही आता शरद पवार यांच्याकडे यावं," अशी साद गोकुळ झिरवळ यांनी घातली आहे. नरहरी झिरवळ यांचीही भूमिका तळ्यात-मळ्यात
गतवर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्यासोबत आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून झिरवळ यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली. कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय असल्याची चर्चा होती. तेव्हापासूनच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र झिरवळ यांनी विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत याबाबतचा निर्णय घेणं टाळल्याचं दिसत आहे.