नाशिक : कोट्यवधी रुपये जाहिरातबाजीवर खर्च करून गतिमान सरकारची जाहिरात करणारे राज्य सरकार गतिमान नव्हे तर शक्तिहीन व नपुंसक सरकार असल्याचे खुद्द सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर असे सरकार काय कामाचे, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील लोकांकडे कोणी बघत नाही म्हणून जाहिरातबाजीतून चेहरे दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याची बोचरी टीका केली आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात जात, धर्माच्या आधारावर वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत राजकीय पोळी भाजून घेण्याचा उद्योग काही लोक करीत असून, संभाजीनगरची घटना त्याचाच एक प्रकार असल्याचा आरोप करून अजित पवार यांनी, महापुरुषांच्या नावाने राज्यपालांपासून ते पक्ष प्रवक्त्यांपर्यंत साऱ्यांनी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावेळी मूग गिळून बसलेल्यांनी आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी सावकर गौरव यात्रा काढण्याची घोेषणा केली आहे. सावरकरांचे योगदान विसरता येणार नाही, मात्र ज्यावेळी महापुरुषांचा अवमान केला गेला त्यावेळी त्यांच्या नावाची गौरव यात्रा का काढली नाही, असा सवालही त्यांनी भाजपला केला.
गेल्या सात महिन्यांत राज्य सरकारने जाहिरातबाजीतून ७५ कोटी रुपये खर्च केले, आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यावर आम्ही आक्षेप घेतला. तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीतून २८ कोटी रुपये रुग्णांच्या साहाय्यतेसाठी केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, त्यापेक्षाही दुप्पट, तिप्पट पैसे या सरकारने जाहिरातबाजीवर खर्च केल्याची टीका करून पवार यांनी, एखाद्याला आपले प्रॉडक्ट म्हणजे साबण, तेल, पावडर विकायचे असेल तर जाहिरात करावी लागते. परंतु काम न करणारे सरकार जाहिरातीतून आपले फोटो दाखवित असून, जाहिरातबाजीपेक्षा लोकांच्या मनात स्थान निर्माण करा, असा सल्लाही दिला.