एस. आर. शिंदे ल्ल पेठराज्यस्तरावर आघाडी व युती फिस्कटल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र चूल मांडल्याने पेठ तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, गट व गणांतही पंचरंगी लढतींनी निवडणुकांचा आखाडा चांगलाच रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.पेठ तालुक्यात दोन गट व चार गण असून, जवळपास सहा प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजपा-सेनेची युती व कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी फिस्कटल्याने स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पूर्वीच्या पेठ गटाची पुनर्रचना करून त्याचे धोंडमाळ गटात रूपांतर करण्यात आले असून, या गटातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा कोहोर गटाचे विद्यमान सदस्य भास्कर गावित रिंगणात आहेत. यापूर्वी हा गट शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेने भास्कर गावित यांना समोर आणले आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष पद्माकर कामडी हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. मोदी लाटेनंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून तालुकाध्यक्षपदाचे मानकरी ठरले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने जिल्हा बँकेचे संचालक नामदेव हलकंदर यांना उमेदवारी देऊन आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉँग्रेसने राष्ट्रवादीचे बोट सोडल्यानंतर पुन्हा एकदा माजी जि. प. सदस्य भिका चौधरी यांना उमेदवारी देऊन तालुक्यातील ज्येष्ठ सभासदाला संधी दिली आहे. मनसेने धोंडमाळ गटातून निवडणूक न लढवणे हे एक कोडेच असून, मनसेचे तालुकाप्रमुख सुधाकर राऊत यांनी गटाऐवजी गणात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना मागील पाच वर्षांत केलेल्या कामांचे विकास कार्ड घेऊन मतदारांसमोर जाणार असली, तरीही भाजपाने मोदी कार्ड पुढे काढून निवडणुकांमध्ये रंग भरला आहे. वनविभागाच्या वनजमिनीसह विविध शासकीय योजनांसाठी वारंवार रस्त्यावर येणाऱ्या माकपाने आता आमदारपुत्रांना आयात केले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसची भूमिकाही यामध्ये महत्त्वाची ठरणार असून, कॉँग्रेसला ‘एकला चलो’ची भूमिका पार पाडावी लागणार आहे.
पंचरंगी लढतींनी रंगणार निवडणुकीचा आखाडा
By admin | Published: February 08, 2017 10:39 PM