नाशिक : ‘परंपरेसे हमारा आखाडा है, आपने उसे आश्रम कैसे बना दिया? जब की सब आखाडोंको सुविधा दि जा रही है तो हमे क्यूं नही? हमे भी शेड मिलनी चाहिए अगर नही दोगे तो उपर तक कम्पलेट करुंगा’ अशी धमकी वजा इशारा त्र्यंबकेश्वरच्या सीताराम आखाड्याचे महंत श्री बालयोगीदासजी महाराज यांनी जिल्हा प्रशासनााला दिला आहे. त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाडे व जवळपास चोवीसहून अधिक धार्मिक संस्थांना सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी पक्के शेड बांधून दिले जात असून, त्यासाठी जवळपास साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्र्यंबक नगरपरिषदेने मंजूर केलेल्या या शेडबाबत अगोदरच वाद असतानाच त्यात सीताराम आखाड्याच्या महंतांनी उडी घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वरच्या इतर आखाड्यांप्रमाणेच सीताराम आखाडा जुना व परंपरागत असून, कुंभमेळ्याच्या शाहीस्नानात आखाडा सहभागी होत असतानाही सोयी-सुविधा पुरविण्याबाबत भेदाभेद केला जात असल्याचा आरोप बालयोगीदास महाराज यांनी केला. सोमवारी बालयोगीदास महाराज यांनी कुंभमेळा अधिकाऱ्यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. सीताराम आखाड्याला आश्रम करण्यामागचा हेतू काय? याबाबत जाब विचारतानाच आखाड्याला शेड देतात की नाही अशी निर्वाणीची विचारणा करून तुम्हाला द्यायचे नसेल तर तसे सांगा, त्र्यंबकच्या मुख्याधिकाऱ्याकडे पाठवू नका, ते म्हणतात तुमच्याकडे आणि तुम्ही म्हणतात त्यांच्याकडे, असे करू नका अशी तंबी देऊन तुमच्याकडून होत नसेल तर सांगा, मी वरून शेड मंजूर करून आणतो, असे महंतांनी सांगताच मेळा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. सुमारे अर्धातास महंतांनी कुंभमेळा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर महंतांची समजूत घालण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून सीताराम आश्रमाला शेड मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘उपर तक कम्पलेट करुंगा’ आखाडा महंत यांचा प्रशासनाला इशारा
By admin | Published: May 20, 2015 1:19 AM