नाशिक : ‘श्रीकांता कमलकांता असं कसं झालं’, ‘अक्कण माती चिक्कण माती’, ‘हरीच्या नैवेद्याला केली जिलेबी’, ‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू’ या आणि अशा विविध पारंपरिक गीतांचे सादरीकरण करत रविवारी (दि. २४) गुलालवाडी व्यायामशाळेतील मैदानावार भोंडल्याचा खेळ उत्साहात साजरा झाला. ‘ठेवा संस्कृतीचा’ आणि गुलालवाडी व्यायामशाळा यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चारशेहून अधिक महिलांनी एकत्र येत हत्तीच्या मूर्तीभोवती फेर धरून पारंपरिक लोकगीतांचे सादरीकरण केले. भोंडल्याचा खेळ खेळण्यासाठी केशरी रंगातील पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांमध्ये यावेळी विशेष उत्साह बघायला मिळाला. भोंडल्यासह श्रीसुक्त पठणाची १६ आर्वतने, संगीत खुर्ची स्पर्धा आणि गरब्याचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. ठेवा संस्कृतीचा या व्हॉट्स अॅप ग्रुपमधील महिला सदस्या एकत्र येत आपले पारंपरिक सण कुठलाही गाभा न बदलता साजरा करत असतात. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात संगीत खुर्ची स्पर्धेतील आणि गरब्यातील उत्कृष्ट सादरीकरण गटात ‘ठेवा संस्कृतीचा’ ग्रुपला सन्मानित करण्यात आले. यावेळी ठेवा संस्कृतीच्या संस्थापिका पल्लवी पटवर्धन, गुलालवाडी व्यायामशाळेचे बाळासाहेब देशपांडे यांच्यासह वैशाली साठे, गीतांजली आव्हाड, गायत्री बेळगे, मनाली गर्गे, वैशाली शुक्ल, वैशाली बोडके, अनघा धोडपकर, प्रिया देशपांडे यांच्यासह व्यायामशाळेचे पदाधिकारी प्रदीप दशपुत्रे, अवधूत गायधनी, मनोज शौचे, परशुराम पैठणकर, चंद्रशेखर आयाचित, मधुकर गायधनी, शरद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘अक्कण माती चिक्कण माती’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:27 AM