बंडू खडांगळे, लखमापूर : दिंडोरी तालुक्याला औद्योगिक वसाहतीची पंढरी म्हणून ओळखले जाते. तालुक्यात अनेक कंपन्या नावारूपाला आलेल्या असल्याने आता औद्योगिक वसाहत क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या अक्राळे एमआयडीसीकडे अनेक कंपन्यांच्या नजरा वळाल्याने बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्यात नवनवीन उद्योग स्थापनेसाठी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येत आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उद्योग वसाहतीसाठी आपल्या जमिनी दिल्या. कारण यामुळे तरी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेल ही भावना त्यामागे होती. परंतु मधल्या काही काळात काही सुविधांचा अभाव असल्याकारणांनी उद्योजकांनी या वसाहतीकडे पाठ फिरविली होती. आता मात्र अनेक ठिकाणी जागेची कमतरता ही समस्या निर्माण झाल्याने अनेक कंपन्यांची पावले अक्राळे एमआयडीसीकडे वळाली आहेत.
अक्राळे एमआयडीसी वसाहतीसाठी या भागाचे निरीक्षण करून जवळजवळ ३७२ हेक्टर जमिनीपैकी साधारणपणे २०६ हेक्टर जमीन एमआयडीसीने घेतली आहे. त्यामुळे शासनाची या ठिकाणी एक भव्यदिव्य औद्योगिक वसाहत निर्माण होईल ही संकल्पना आता रंग घेऊ लागली आहे. सध्या या वसाहतीमध्ये काही कंपन्यांनी आपले उद्योग सुरू केल्याने महिला व तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध झाला आहे. परंतु आता काही नामांकित कंपन्या या ठिकाणच्या जागेची पाहणी करून उद्योग सुरू करण्याला पसंती दर्शविल्याचे बोलले जात आहे.
-------------------------
इंडियन ऑइल कंपनीकडून जागेची चाचपणी
रिलायन्स उद्योगसमूहाने या वसाहतीमध्ये १२०० कोटींची गुंतवणूक केली आहे, तर त्यापाठोपाठ इंडियन ऑइल कंपनीनेही या वसाहतीमध्ये जागेची मागणी केली आहे. रिलायन्स उद्योगसमूहाने अक्राळे एमआयडीसीमध्ये जवळपास १६१ एकर जागा घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. इंडियन ऑइल कंपनी जागा मिळवण्यासाठी चाचपणी करीत असल्यामुळे स्थानिक बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
(०७ अक्राळे)