नाशिक : सियावर रामचंद्र की जय... अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय...असा जयघोष करत अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या कार्याचा भूमिपूजन सोहळ्याचा जल्लोष बुधवारी (दि.५) मोठ्या उत्साहात नाशिकच्या भूमीतही पार पडला. प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनित झालेल्या पंचवटी परिसरात भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने गोदापूजन, कारसेवकांचे पाद्यपूजन तसेच काळाराम मंदिराबाहेर प्रभु श्रीरामाचे प्रतिमापूजन करण्यात आले.पंचवटी,तपोवनातील मंदिरे मंगळवारपासूनच जणू प्रभु श्रीरामाच्या रंगात रंगल्यासारखी झाली होती. प्रत्येकाच्या मनात अयोध्येत मंदिराचे पुनर्निर्माण होत असल्याचा आनंद अगदी ओसंडून वहात होता. त्यामुळेच कुठे गुढी उभारली, कुठे दीपोत्सव, कुठे रांगोळीने स्वागत तर कुठे घंटानादाचे आयोजन अशी लगबग समस्त नाशिकमधील मंदिर, मठांमध्ये दिसून आली. ज्या पंचवटीच्या परिसरात प्रभु श्रीरामाचे वास्तव्य होेते, त्याच परिसरात उभ्या असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराबाहेर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तर भाजपाच्या खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत रामकुंडावर गोदापूजन तसेच रविवार कारंजावर दहा कारसेवकांचे प्रतिकात्मक पाद्यपूजन करण्यात आले.त्याआधी बुधवारी पहाटे काळाराम मंदिरात नियमित काकडआरती, सकाळी पाद्यपूजनाचा दैनंदिन सोहळा पार पडला. तसेच माध्यान्हीच्या नियमित आरतीनंतरदेखील घंटानादाने या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
गजर रामनामाचा अन् जल्लोष स्वप्नपूर्तीचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 1:10 PM
कुठे गुढी उभारली, कुठे दीपोत्सव, कुठे रांगोळीने स्वागत तर कुठे घंटानादाचे आयोजन अशी लगबग समस्त नाशिकमधील मंदिर, मठांमध्ये दिसून आली
ठळक मुद्दे पहाटे काळाराम मंदिरात नियमित काकडआरतीसकाळी पाद्यपूजनाचा दैनंदिन सोहळा