घोटी : इगतपुरी तालुक्यात अनेक अतिदुर्गम आदिवासी गावे आहेत. वर्षानुवर्ष शिक्षणाशी नाळ जुळत नसल्याने सर्व क्षेत्रात मागास राहण्याचे प्रमाण एकीकडे वाढतच आहे. अशा स्थितीत धामडकी या आदिवासी गावाचा दर्जेदार शिक्षणासह गावाचा कायापालट झाला. विविध कामांद्वारे गावाला झपाट्याने बदलून टाकणारे प्राथमिक शिक्षक प्रमोद परदेशी हे गावासाठी देवदूत ठरले आहेत.धामडकी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतांना त्यांनी विविध संस्थांच्या मदतीने तालुक्यातील १२ शाळांना डिजिटल आणि भौतिक सुविधा मिळवून दिल्या. तीन गावांना रोटरी क्लब बॉम्बेच्या सहाय्याने मोफत शौचालये बांधून हगणदारीमुक्त केले. मुंबईच्या पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रगती अजमेरा, अमेरिकावासी अभिनव अजमेरा हे परदेशी यांच्या समन्वयाने भौतिक व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी गावाला भरीव मदत करत आहेत. विद्यार्थ्यांना वर्षभराचे सर्व शैक्षणकि साहित्य, वह्या, पेन, पेन्सील, दप्तर यासह शाळेला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात येतात. डिजिटल शाळेसाठी प्रोजेक्टर, कॉम्पुटर, स्क्र ीन देवून विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. आदिवासी महिला पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असल्याने शाळेला व गावाला पाण्याचे जलकुंभ बांधले.अॅडव्हेंचर एज्युकेशनल टूर सोबत असलेल्या संपर्कामुळे परदेशी मुंबईच्या नामांकित इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा धामडकी शाळेत घेतला. यात शाळेची रंगरंगोटी, स्वच्छतागृह दुरु स्ती, खिडक्या बदलून शाळेचे रु पडे बदलवले. शाळेसह गावात सौर दिवे बसवून गाव प्रकाशित केले. ऊर्जा ग्रुपकडून शाळेला इन्व्हर्टर दिल्यामुळे शाळेत २४ तास वीज आहे. गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी तीन शिलाई मशीन मोफत दिल्या. टच वूड फाऊंडेशनचे कपिल सुराणा, बालरोगतज्ञ डॉ. संगीता लोढा यांच्यामार्फत धामडकी शाळेत सहा महिन्यात विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांची मोफत आरोग्य, रक्त तपासणी करून विद्यार्थ्यांना मोफत औषधे दिली जातात.
शिक्षकाची किमया, गावासह शाळेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 2:49 PM