नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामांसाठी ग्रामपंचायतीकडून दाखले घेण्याची आवश्यकता नसून, त्यांना स्वयंघोषणापत्रावर सर्व दाखले मिळणार आहेत. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने यासंदर्भातील आदेश नुकताच पारित केला आहे. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक यांच्या अधिकारात मात्र कपात होणार आहे.अनेकदा ग्रामस्थांना विविध दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये जावे लागत असे. तेथे सरपंच, ग्रामसेवक उपलब्ध नसल्यास ग्रामस्थांनी अतिशय परवड होत असे. ग्रामविकास विभागाने ही समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांना सर्व दाखले स्वयंघोषणापत्रावर उपलब्ध होतील, असा आदेश पारित केला आहे. या आदेशाने ग्रामस्थांनी परवड थांबणार असली तरी सरपंच व ग्रामसेवकांच्या अधिकारात कपात झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.ग्रामीण भागात ग्रामस्थांना दारिद्रयरेषेखालील असल्याचा दाखला, रहिवासी दाखला, विधवा असल्याचा दाखला, विभक्त कुटुंब दाखला, बेरोजगार दाखला, नोकरीत असल्याचा दाखला, गावात भाड्याने राहत असल्याचा दाखला, नळ जोडणी दाखला, शौचालय असल्याचा दाखला व शौचालय वापरत असल्याचा दाखला, अपत्य दाखला, चरित्र्याचा दाखला, वीजजोडणी नाहरकत दाखला, जन्म-मृत्यू नोंद दाखला, शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला, बचतगट, बॅँक कर्जपुरवठा व इतर कोणत्याही शासकीय सेवेचा लाभ न घेतल्याचे दाखले दिले जातात. यापूर्वी त्यावर सरपंच व ग्रामसेवकांची स्वाक्षरी असे, परंतु आता नव्या आदेशान्वये दाखल्याऐवजी संबंधीत ग्रामस्थांना स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.नव्या आदेशामुळे सरपंच व ग्रामसेवकांचे अधिकार कमी झाले असून, खोट्या व चुकीच्या कामांना बळ मिळण्याची शक्यता अधिक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
स्वयंघोषणापत्रावर मिळणार सर्व दाखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 5:43 PM