नाशिक : विद्यापीठांना संलग्न महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने अभ्यासक्रमातील गुणवत्ता विकासावर त्याचा परिणाम होत असून, सध्याच्या स्थितीत विद्यापिठांना केवळ परीक्षांचे संयोजन करण्याचे काम करावे लागत आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी आता विद्यापीठांशी संलग्नित राहण्यापेक्षा स्वायत्त होण्याच्या दिशेने विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले. सध्याच्या स्थितीत विद्यापीठांना आठशे ते नऊशे महाविद्यालय संलग्न आहेत. ही स्थिती सुधारण्याची गरज असून, स्वायत्त महाविद्यालयांना राष्ट्रीयस्तरावर लौकिक लाभत असल्याने केटीएचएनसारख्या महाविद्यालयांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (दि.२८) आयोजित माजी प्राचार्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावर संस्थेचे उपसभापती राघोनाना आहिरे, सेवक संचालक नानासाहेब दाते, संचालक अशोक पवार, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य अॅड. एकनाथ पगार आदी उपस्थित होते. डॉ.पटवर्धन म्हणाले, की केटीएचएम महाविद्यालय हे शहरी-ग्रामीण भागात दुवा साधणारे आहे. नॅक मानांकनासह अन्य विविध स्तरांवर महाविद्यालयाने उंची गाठलेली आहे. अशा स्थितीत महाविद्यालयाने स्वायत्ता स्वीकारून इतरांपुढे आदर्श ठेवण्याची गरज आहे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले.सुवर्णमहोत्सवी वर्षकेटीएचएम महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रावसाहेब थोरात सभागृहात माजी प्राचार्यांचा सत्कार सोहळा रंगला. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते माजी प्राचार्य, डॉ. गोपीचंद ठाकरे, डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. आर. डी. दरेकर व केटीएचएम महाविद्यालयाते प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व महाविद्यालयांनी स्वायत्तेचा विचार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:28 AM