नाशिक: गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी अनेकविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्या १०० टक्के पूर्ण झालेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या पाहणीत महापालिकेच्या गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्राजवळदेखील गटारी वाहत असल्याचे आढळल्याने उपाययोजनांचा उपयोग काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने विविध प्रकारच्या उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही हे तपासण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची उपसमिती असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासहउपसमितीने दोन दिवस शहरात पाहणी दौरा केला. अंबड व सातपूर येथील कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी यांची पाहणी केली व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. अंबड औद्योगिक क्षेत्रात पाहणी करीत असताना दातार स्वीच गिअर या कंपनीशेजारी असलेला नैसर्गिक नाला संपूर्णपणे बुजवून तो वळविण्यात आल्याचे आढळले. त्यामळे औद्योगिक क्षेत्रात दुर्लक्षामुळे नाले बुजवण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
गोदावरी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने गंगापूर गाव येथे मलनिस्सारण केंद्र कार्यान्वित केले आहे. मात्र, गंगापूर गावात असलेला सांडपाण्याचा नाला अद्यापही प्रवाही असल्याचे आढळून आले. याशिवाय बारदान फाट्याजवळ असलेला नाला, सोमेश्वर नाला, चिखली नाला, आनंदवली नाला, चोपडा नाला, रामवाडीजवळील लेंडीनाला, टाळकुटेश्वर पुलाजवळील नागझरी नाला, कन्नमवार पुलाजवळील नाला व नासर्डी व गोदावरी संगम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नासर्डी नदीतून सांडपाणी पाणी आढळून आले या सर्व नाल्यांतील पाण्याचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले आहे.