अतुल शेवाळे/ मालेगाव : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावी महापालिकेचे ३९० बेड क्षमतेची पाचही कोविड सेंटर कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. बाधितांची संख्या घटत असल्याने मालेगावकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणची साधनसामग्री, उपकरणे काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेत. सामान्य रुग्णालयात केवळ १७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून मालेगावकर कोरोनाशी संघर्ष करत होते. गेल्या मार्च महिन्यात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने सहारा सेंटरची ऑक्सिजन बेड क्षमता वाढवून २२० केली हाेती. पहिली लाट ओसरल्यानंतर बंद केलेले मसगा व हज ट्रेनिंग सेंटर पुन्हा कार्यान्वित केले हाेते. मसगाच्या दाेन केंद्रांवर १०० तर हज सेंटरमध्ये ४५ बेडची व्यवस्था हाेती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तीनही सेंटरची रुग्णसंख्या फुल्ल हाेती. मात्र, दुसरी लाट ओसरू लागल्याने रुग्णांचा आलेखही कमालीचा घसरला आहे. महापालिकेने सुरू केलेले सहारा, मसगा, हज, दिलावर सेंटर रुग्णाअभावी बंद करण्यात आले आहेत.
प्रतिक्रिया
मालेगाव महापालिका क्षेत्रात कोरोनाबधितांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. पाचही कोविड सेंटर रुग्णांअभावी बंद पाचही सेंटर कायमस्वरूपी बंद केली आहेत. त्या ठिकाणचे साहित्य, उपकरणे काढून घेण्यात येत आहे. - डॉ. सपना ठाकरे
वैद्यकीय अधिकारी मनपा, मालेगाव
मालेगाव शहर व तालुक्यातील रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. सामान्य रुग्णालयातील १७ रुग्ण इतर तालुक्यांतील आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मालेगाव शहर व तालुक्यातील एकही रुग्णांचा त्यात समावेश नाही.
डॉ. हितेश महाले
वैद्यकीय अधीक्षक, सामान्य रुग्णालय मालेगाव