लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : सिन्नरफाटा येथील चार वर्षे वयाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व यातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी गवळी समाजबांधव व सर्वपक्षीयांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शांतता मोर्चा काढण्यात आला होता. सिन्नरफाटा येथे काही दिवसांपूर्वी एका फरसाण कारखान्याच्या मालकाने कारखान्यात कामाला असलेल्या महिला कामगाराच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या अमानवी गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी गवळी समाजबांधव व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुर्गा उद्यान येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर शांतता न्याय मोर्चा काढला होता. दुर्गा उद्यान येथून निघालेला मोर्चा मुक्तिधाम, बिटको, गोरेवाडी रस्ता मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांच्या हाती निषेधाचे, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, लैंगिक अत्याचाराचा निषेध असो असे फलक होते. मोर्चामध्ये लहान मुली, युवती, महिला, नागरिक, गवळी समाजबांधव व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते हाताला काळ्या रीबिन बांधून कुठलीही घोषणा न देता मूक मोर्चा काढला होता. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त उन्मेष महाजन यांना गवळी समाजाच्या पाच मुलींनी दिलेल्या निवेदनात सदर खटला जलद न्यायालयात चालविण्यात यावा, सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, पुराव्यात कसूर होऊ नये, पीडित बालिकेचे तिच्या कुटुंबीयांसह पुनर्वसन व्हावे, आरोपीस फाशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष किसन हुंडीवाले, प्रांताध्यक्ष हिरामण गवळी, उमाकांत गवळी, अनिल कोठुळे, सोमनाथ हिरणवाळे, सागर गवळी, बापु निस्ताणे, विजय घुले, अमोल घुगरे, जगन गवळी आदींसह शहर-जिल्ह्यातील गवळी समाजबांधव, महिला, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहायक पोलीस निरीक्षक सूरज बिजली, मंगेश मजगर, सुदाम भुजबळ आदिच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नाशिकरोडला सर्वपक्षीय मोर्चा
By admin | Published: May 25, 2017 1:46 AM