नाशिक - आम्हा घरी शब्दांचे धन, शब्दांचीच रत्ने अर्थात ग्रंथ हीच समृद्धी मानणाऱ्या संत आणि अन्य ज्येष्ठ लेखकांचे ग्रंथ पालखीतून सवाद्य सारस्वतांनी आपल्या खांद्यावर मिरवले आणि या ग्रंथ दिंडीने अवघी कुसुमाग्रज नगरी दुमदुमली. आज परंपरेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात केली.
आज सकाळी नाशिक शहरातील टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ तसेच कृषी मंत्री दादा भुसे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दोन पथक तसेच शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे पावसाळी वातावरण असूनही अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ग्रंथदिंडी सुरू झाली.
टिळकवाडी येथून निघालेली ही दिंडी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयापर्यंत जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजेपासून विविध दालनांची आणि प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलन स्थळी म्हणजेच आडगाव येथील कुसुमाग्रज नगरी येथे होणार आहे.
नाशिकमध्ये ग्रंथ दिंडीतही ठाले पाटील यांची विलंबाने हजेरी -अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचे ग्रंथ दिंडी प्रसंगी अर्धा तास उशिराने आगमन झाले. आयोजकांच्या मनमानी कारभारामुळे त्यांनी दिंडीस येणे टाळण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात येत आहे. मात्र आयोजकांनी फोनाफोनी करून त्यांना बोलावून घेतल्यानंतरच ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.