नाशिक : सक्षम लोकशाहीसाठी ज्याप्रमाणे संसद, शासन, विरोधक आवश्यक असतात. त्याचप्रमाणे सत्य बोलणारे, स्वतंत्र बाण्याने लिहिणारे साहित्यिकही गरजेचे असतात. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी साहित्यिकांकडे स्वातंत्र्य असायलाच हवे. तसेच त्यासाठी सर्व भाषांनी एकत्रितपणे आवाज उठविण्याची आवश्यकता असल्याचे रोखठोक प्रतिपादन प्रख्यात कवी जावेद आख्तर यांनी केले.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अख्तर बोलत होते. यावेळी बोलताना अख्तर यांनी लेखक जोपर्यंत काल्पनिक लिहतो, सूर्य, चंद्र, तारे, प्रेम, प्रेयसी यांच्याबाबत लिहित असतो, तोपर्यंत त्याचे कौतुक होते. तोपर्यंत तो सर्वांना चांगला वाटतो. मात्र तो सत्य लिहायला, शब्दांतून वास्तव मांडायला लागला की त्याला वाईट ठरवले जात, सध्याच्या जगात तर त्याला राष्ट्रविरोधी ठरवले जाते. राज्यकर्ते आणि लोकांना काल्पनिक लिहिलेले आवडते. मात्र रस्त्यावरील लढाई लढणारे आणि प्रश्न उपस्थित करणारे कवी, साहित्यिक नको असतात. सध्या सत्य लिहिणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. साहित्यिकांनी प्रेमकथा लिहिण्याऐवजी सत्य आणि हक्कासाठी लेखन केले पाहिजे. साहित्यिकांनी कोणताही विचार न करता , पक्षनिष्ठा पाळत न बसता केवळ देशहितासाठी लिहिले पाहिजे. अशा संमेलनांतून नागरिकांनी देशातील विविध भाषांतील मोठे लेखक, कवींना बोलावून काय लिहित आहात याबाबत विचारणा करण्याची गरज असल्याचे अख्तर यांनी सांगितले.
नदीत उभे असताना पाणी आवडत नाही म्हणजे ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे साहित्य आणि राजकारणाचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फो
१९३६च्या खऱ्या ठरावाची गरज
१९३६ साली स्थापन झालेल्या प्रागअेसिव्ह रायटर्स या सर्व भाषांच्या लेखकांच्या संस्थेत एक ठराव करण्यात आला होता. आम्ही आता फुले, तारे, प्रेमाच्या गोष्टी करणार नसून केवळ देशहिताच्या, सामाजिक समता आणण्याच्या आणि नारीच्या उद्धारासाठीच लेखणी झिजवण्याचा ठराव करण्यात आला होता. त्या ठरावाची खरी आज आहे. ‘जो बात कहते डरते है सब, तू वो बात लिख, इतनी अंधेरी न थी कभी पहले रात कभी’ असे म्हणत अख्तर यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
----
इन्फो
मराठीची स्त्री साहित्य परंपरा सर्वात जुनी
महाराष्ट्रात ८०० वर्षांपूर्वी संत मुक्ताबाई यांनी लेखन केले. त्यांना त्या काळात स्वातंत्र्य होते, यावरून मराठीची समृद्धता लक्षात येते. मात्र दोनशे-तीनशे वर्षांपूर्वीही युरोप आणि अमेरिकेत महिलांना लिहिण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे बऱ्याच महिला साहित्यिक पुरुषांच्या नावे लिखाण करावे लागत होते. त्यांना त्या काळी युरोपातील अनेक मोठमोठ्या साहित्यिकांनी त्यास आक्षेप घेतला होता. ही वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्र आणि मराठी किती जुन्या काळापासून प्रागतिक आहेत, ते दिसून येत असल्याचे अख्तर यांनी सांगितले.