नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण बहुमत भाजपाला मिळाले. राज्यातील सत्ता असताना महापालिकेतील भाजपाही जोरात होती; मात्र आता राज्यातील सत्ता बदलामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे सत्तारुढ भाजपाकडून सांगितले जाते. कोरोना आणि सत्ता बदल यामुळे अनेक विकासकामे रखडल्याचे आरोप केले जात असताना दुसरीकडे मात्र, सत्तारुढ भाजपाचे लोकप्रतिनिधीच तक्रारी करीत आहेत तसेच आंदोलनाचे इशारे करून पक्षाला घरचा आहेर देत आहेत.
भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी यापूर्वी डेंग्यूचा उद्रेक वाढल्याने प्रशासनाला पत्र देताना डेंग्यू नियंत्रणात अपयश आल्याचा ठपका ठेवला होता. तसेच प्रसंगी वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याला आठ दिवस उलटत नाही तोच त्यांनी मंगळवारी (दि.२१) पुन्हा रस्त्यावरील खड्ड्यांच्या बाबतीत पत्र देताना हे काम नित्कृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्याच आठवड्यात भाजपाचे मुकेश शहाणे यांनी विद्युत विभागातील एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्युत विभागाला टाळे ठोकले. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली होती. सोमवारी (दि.२०) झालेल्या महासभेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती भामरे यांनीही नाशिक महापालिकेत आणि समितीत सत्ता असताना एकही प्रस्ताव कार्यवाहीत नसल्याने नाराजी व्यक्त करीत पुढील महासभेत सर्व समिती सदस्य उपोषण करतील असा इशारा दिला आहे.
इन्फो...
विरोधक शांत
महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष विरोधात आहेत; मात्र त्यांनी विरोध केले म्हणून कोणताही प्रकल्प राेखला गेलेला नाही. केवळ इशारे, शासनाकडून स्थगिती आणू या पलीकडे विरोधाची धार नाही. दुसरीकडे भाजपाकडून मूलभूत विषयावरून विरोध केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.