सिडको : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्व संघटना एकत्रित घेऊन पुढाकार घेणार असून, यासाठी युती सरकारकडेही साकडे घालणार असल्याचे अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक विजयसिंह महाडिक यांनी सांगितले.सिडकोतील माउली लॉन्स येथे अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या दहाव्या राज्यस्तरीय अधिवेशनप्रसंगी मार्गदर्शन करताना महाडिक बोलत होते. आपली संस्कृती ही दान संस्कृती आहे. जिथे कमी पडत असेल तिथे मदत केली पाहिजे. मराठा सेवा संघाने १८ संघांना एकत्र करून समाजाचे काम सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे स्मारक लवकरात लवकर झाले पाहिजे, ही आमची मागणी असून, यात शासनानेही पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी न लावल्यास मुंबईची जीवनदायी असलेल्या लोकल रोखून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महाडिक यांनी दिला. मराठा धोरण ही आमची संकल्पना आहे. केंद्र व राज्यातही समाजाचे खासदार व आमदारांची संख्या अधिक असून, त्यांनीही यासाठी निधी उपलब्ध करून पुढाकार घेतला पाहिजे. यापुढील काळात मराठा शेतकरी संघटना सुरू करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले. शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मोरे म्हणाले की, मराठा समाजाला अधिक सुधारणा करून आगामी काळात महाराष्ट्रभर मराठा सेवा समाजाचा दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यावेळी व्यासपीठावर शिवचरित्रकार डॉ. दिलीप धानके, मनीषा माने, वामनराव भिलारे, सुनील बागुल, अशोक शिंदे, किशोर पाटील, आयोजक ज्ञानेश्वर गायधनी, नंदू आबा शिंदे, मनोज बोराडे, याज्ञिक शिंदे, तुषार मटाले, नगरसेवक सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार आदि उपस्थित होते. कार्यक्रमाला अनेक कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. (वार्ताहर)
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्व संघटना एकत्रित
By admin | Published: June 01, 2015 1:42 AM