नाशिक- कोरोना निर्बंध संपुष्टात आल्यानंतरही शहरातील सुमारे पाचशे उद्याने बंद असून त्यामुळे नाराजी व्यक्त होत असतानाच आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच सर्व उद्याने खुली करण्याचे निर्देश दिल्याने ऐन सुटीच्या कालावधीत बालगाेपाळांना बागडण्याची सोय होणार आहे. मंगळवारी (दि. २६) आयुक्तांनी उद्याने खुली करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि. २५) महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी हे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने १ एप्रिलपासून विविध प्रकारचे कोरोना निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील लॉन्स, मॉल तसेच चित्रपटगृह असे सर्व काही सुरळीत झाले असताना महापालिकेने उद्याने मात्र खुली केली नव्हती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच महापालिकेला त्वरित उद्याने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आदेश दिले आहेत.