नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शाळा, तरण तलाव, नाट्यगृहे महापालिकेने बंद केली आहेत. परंतु त्यापलिकडे जाऊन आता ३१ मार्च पर्यंत सर्व उद्यानेही बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व कार्यालयात येणाऱ्या नागरीकांच्या सोयीसाठी प्रवेशव्दारावरच हँड सनिटायझर ठेवण्यात येणार आहे. नागरीकांनी शक्यतो महापालिकेत येऊच नये, त्याऐवजी विविध कामांसाठी आॅनलाईन सेवेचा वापर करावा असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूभीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज ही माहिती दिली. मंगळवारी (दि.१७) महापालिकेची महासभा बोलविण्यात आली होती मात्र, त्यापूर्वी सोमवारी (दि.१६) उपमहापौर व सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली आणि त्यात मंगळवारी होणारी महासभाही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेच्या शाळा, तरण तलाव आणि नाट्यगृहे अगोदरच बंद करण्यात आली आहेत. आता खबरदारीचा भाग म्हणून सुमारे साडे चारशे उद्याने देखील ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून त्यासंदर्भातील आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निर्गमीत केले आहेत.
दरम्यान, महापालिकेत विविध कामांसाठी नागरीक तसेच व्यावसायिक महापालिकेत येत असतात. त्यांच्या सोयीसाठी महापालिकेत हॅँड सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे. मात्र, त्याच बरोबर महापालिकेत येण्याचे टाळणावे असे आवाहन महापौरांनी केले आहे. कोणत्याही कामासाठी आणि तक्रारीसाठी आॅनलाईन अॅप तसेच माझा महापौर अॅपचा वापर करावा असे आवाहन सतीश कुलकर्णी यांनी केले. यावेळी सभागृह नेता सतीश सोनवणे उपस्थित होते.