नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येत्या ३० तारखेपर्यंत अत्यावश्यक सेवागळता सर्वप्रकारची दुकाने बंद राहाणार असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या कालावधीत मद्यविक्रीची दुकाने, बार, मॉल्स, चित्रपटगृहे पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत. संबंधितांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मद्यविक्रीची दुकाने, बार पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. हॉटेल्सची केवळ किचन्स सुरू राहाणार असून, त्यांना फक्त पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आलेली आहे. सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहातील; मात्र ८ वाजेनंतर मेडिकलवगळता बेकरी, भाजीपाला, किराणा, भुसार मालाची दुकाने बंद करावी लागणार आहेत. इतर सर्वप्रकारची दुकाने दिवसभर बंद ठेवली जातील. त्यांना ३० तारखेपर्यंत दुकाने उघडता येणार नाहीत. खासगी आस्थापनांची कार्यालये, पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कारखाने, उद्योग सुरू राहातील. बांधकामाच्या साइटची कामेही सुरू राहातील. याव्यतिरिक्त इतर सर्वच बाबींची दुकाने, आस्थापना या बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू असेल. मात्र बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी असेल. ऑटोरिक्षामध्ये चालकासह तीन व्यक्तींना परवानगी देण्यात आलेली आहे. टॅक्सीमध्ये निश्चित केलेल्या प्रवाशी क्षमतेपेक्षा ५० टक्केच प्रवाशांना प्रवेश देता यईल. मालवाहतूक सुरू असेल.
शासकीय कार्यालयांत ५० टक्के कर्मचारी अन कार्यालयीन कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. कुणालाही पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
मास्क नसल्यास संबंधितास ५०० रुपये दंड असेल. अस्थापनेत त्याचे उल्लंघन होईल, त्या अस्थापनेलाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
--इन्फो--
शासनाच्या सुधारित आदेशानुसार मद्याची दुकाने, बार व रेस्टाॅॅरंट, वाइन शाॅप बंद राहणार आहेत. हाॅटेलमधील अंतर्गत निवासी ग्राहकांना जेवण, मद्याची सुविधा देण्याची मुभा देण्यात आलेली आहे.