जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला दिंडीसोबत निघालेल्या बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील वारकऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. धुलीवंदनाच्या दिवशी पाच ते सहा जणांनी वारकºयांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला होता. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येऊन, गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी कृष्णाई प्रतिष्ठान व परिसरातील वारकºयांकडून करण्यात येत होती.पोलिसांनी सी. सी. टी. व्ही. चित्रिकरणाच्या आधारे तिघांना ताब्यात घेतल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम बीज निमित्त पंढरपुर ते देहू पायी दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये जायखेडा येथील वै. कृष्णाजी माऊलींच्या शिष्यांसह वारकरी सहभागी झाले होते. मंगळवारी दुपारी एक वाजता ही दिंडी खडकीतील किर्लोस्कर कंपनीजवळील ब्राऊन चेरी येथे पोचली. त्यावेळी मद्यपान केलेल्या चार ते पाच जणांनी वारकºयांना रंग टाकण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती काही वारकºयांनी जायखेडा येथील मूळ रहिवासी व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांना मोबाईल द्वारे कळवताच त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधून पोलिसांची मदत मिळून दिली. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात ही दिंडी देहूकडे रवाना करण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील गुंड फरार झाले होते. खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गिरी व ठाकूर यांनी तत्परतेने कार्यवाही करीत तीन संशयितांना ताब्यात घेऊन कारवाई केली.
वारकऱ्यांना मारहाण करणारे तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 1:03 PM