येवला : महाराष्ट्रातील भूमीत कुणी चाणक्यबिणक्य चालणार नाही, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षाचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झाले नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सदर प्रतिक्रिया व्यक्त केली. आज कोकणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होत असून त्या पूर्वी खासदार नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल अशी प्रतिक्रिया देत भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू झाले अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावर भुजबळांनी कोणी चाणक्यबिणक्या महाराष्ट्रातील भूमीत चालणार नसल्याचे स्पष्ट करत, महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले असून ज्यावेळी जनता सरकारला स्वीकारते तेव्हा कोणी हात लावू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
शरद पवार यांना अदानी जाऊन भेटले या विषयावर बोलताना भुजबळ म्हणाले, पवार साहेबांना सगळेच लोक भेटत असतात, त्यामुळे अदानी पवारांना भेटल्यामुळे वीज बिल माफी रद्द झाली असे नाही. खरे तर फडणवीसांच्या काळातील वीज थकबाकी ही ५० हजार कोटीच्या घरात आहे, जर वीज बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी बुडल्याशिवाय राहणार नाही आणि बाकीच्या लोकांना हे हवे आहे. जेवढे अडचणीत येईल तेवढे बघायला अदानी आणि अंबानी आहेच असा टोला भुजबळ यांनी यावेळी लगावला. ओबीसी मोर्चाबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे यांनी २७ तारखेच्या मोर्चाचे आमंत्रण दिले आहे. विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवण्यासाठी शिडीची गरज भासणार नसल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना अगोदर सरकार पाडून तर दाखवा मग शिडी लावायची कि शिडी बॉम्ब लावायचा हे ठरवा असा टोला भुजबळ यांनी मारला.