नाशिक : दोन माजी महापौर, दोन स्थायी समितीचे माजी सभापती आणि आजी- माजी नगरसेवकांच्या दावेदारीने गाजलेल्या प्रभाग १३ मध्ये काही बड्या दावेदारांनी माघार घेतली असली तरी रिंगणात अजूनही महाराज, नाना असे बाहुबली उमेदवार रिंगणात आहेत. साहजिकच, पक्षीय पॅनलपेक्षा हे भाऊ, महाराज, नानाच आपल्या समवेत या प्रभागाचे भवितव्य ठरविणार आहे.पूर्व प्रभाग तसा राजकीय बलाशाली व्यक्तींचाच प्रभाग मानला जातो. येथे पक्षीय प्रभुत्वापेक्षा राजकीय घराण्यांच्या दबदब्यावरच अधिक निवडणुका होतात. आजवर छोटे प्रभाग असल्याने खैरे, वावरे, चव्हाण, वाघ यांचे भौगोलिक कार्यक्षेत्र वेगळे असले तरी आता बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीने सर्वांचाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून सर्वच बलशाली उमेदवार रिंगणात आले आहेत. इच्छुकांपैकी विनायक पांडेंसारख्या प्रभुतींनी काहींनी माघार घेतल्याने आणखी चुरस असलेल्या लढती टळल्या असल्या तरी प्रभागातील कोणते पॅनल जिंकणार हे त्या पॅनलमधील बलशाली उमेदवार ठरविणार आहेत.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भागात सध्या शाहू खैरे, विनायक खैरे, विनायक पांडे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. साहजिकच इच्छुकांचे राजकारण त्या भोवतीच फिरत आहे. आपल्या सुपुत्राला उमेदवारी न मिळल्याचे निमित्त करून विनायक पांडे यांनी माघार घेतली असली तरी कोणत्याही पक्षाला सर्वच जागांसाठी सक्षम न सापडल्याने त्यांची मदार सक्षम उमेदवारांवर आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत अन्यत्र अन्य पक्षांवर नजर असली तरी या प्रभागात कॉँग्रेसवर नजर होती. शाहू खैरे हे कोणासमवेत पॅनल करतात ही उत्कंठा होती. कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक वत्सला खैरे आणि मनसेच्या नगरसेवक तसेच शाहू (महाराज) खैरे यांच्या नातेसंबंधातील विद्यमान नगरसेवक सुरेखा भोसले तसेच राष्ट्रवादीचे गजानन शेलार असे हे पॅनल बनले आहे. विनायक पांडे यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या आधीच माघार घेतल्याने शिवसेनेची मदार मनसेतून शिवसेनेत आलेले माजी महापौर यतिन (महाराज) वाघ तसेच आता शिवसेनेत दाखल झालेले अपक्ष नगरसेवक संजय चव्हाण यांची कन्या स्नेहल चव्हाण यांच्यावर आहे. प्रभागात सर्वाधिक लक्षवेधी जागा म्हणजे १३ ब म्हणजेच ओबीसी होय. या प्रभागातून शिवसेनेचे अॅड. यतिन वाघ आणि राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांची आमने-सामने लढत आहे. नातेवाईक असलेल्या दोघांचे आमने-सामने येणे संवेदनशील ठरले आहे. शेलार एकेकाळचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गेल्या निवडणुकीत पक्षाने त्यांना वडाळा परिसरातून उमेदवारी दिली, त्यात ते पराभूत झाल्यानंतर सत्तेपासून दूर आहेत, त्यापूर्वीही त्यांचा एकदा पराभव झाला होता. त्यामुळे विजयासाठी ते आसुसले आहेत. याच प्रवर्गात मृणालराज घोडके (भाजपा), ईश्वर कदम (बहुजन विकास आघाडी), चंद्रकात रणदिवे (धर्मराज्य पक्ष), धनश्री वाघ (अपक्ष) नशीब आजमावत आहेत. (प्रतिनिधी)
नाना महाराजांवरच सारी भिस्त
By admin | Published: February 12, 2017 12:32 AM