सिन्नर : एक.. दोन नव्हे तर तब्बल तीन गावांतील सुमारे सात हजार ग्रामस्थ घरांना कुलूप ठोकून येत्या शुक्रवारी (दि. ११) आपल्या लाडक्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी सहा दिवस गाव बंद करून जेजुरीला जाणार आहेत. मºहळ बुद्रुक, मºहळ खुर्द व सुरेगाव अशी सिन्नर तालुक्यातील या तीन गावांची नावे आहेत. कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाला या गावातील ग्रामस्थ कधी एकट्यादुकट्याने किंवा कुटुंबासमवेत जात नाही, तर सर्व ग्रामस्थ एकाचवेळी आपल्या घरांना टाळा ठोकून पालखीची देवभेट घडविण्यासाठी जेजुरीला जात असतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून मºहळकरांनी कुलदेवतेच्या भेटीची आपली आगळीवेगळी परंपरा जपली आहे. जेजुरीला खंडेरायाच्या देवभेटीसाठी या तीन गावांतील ग्रामस्थ रथामध्ये पालखी घेऊन येत्या शुक्रवारपासून शेकडो वाहनांतून निघणार आहेत. मºहळकरांच्या या आगळ्यावेगळ्या प्रथेमुळे देवभेटीचा हा अनुपम सोहळा महाराष्टÑातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. राज्यातील अनेक कुटुंबीयांचे जेजुरीचे खंडेराव कुलदैवत आहे. अनेकजण दरवर्षी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाऊन मानाप्रमाणे पूजाअर्चा करीत असतात. विवाह सोहळ्यानंतर बहुतांश नवदांपत्य जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र मºहळकरांची प्रथाच न्यारीच आहे. त्यांना कुटुंबीयांसमवेत किंवा जोडीने जेजुरीला दर्शनासाठी जाता येत नाही. जेव्हा गावातील खंडोबाची पालखी देवभेटीसाठी जेजुरीला नेली जाते त्याचवेळी पालखीसोबत मºहळकरांना कुलदेवतेच्या दर्शनाचा योग येतो. शुक्रवारी (दि. ११) रोजी मºहळच्या मंदिरातील पालखी देवभेटीसाठी जेजुरीला जात आहे. या पालखीसोबत तिन्ही गावातील ग्रामस्थांसह पांगरी येथील काही ग्रामस्थ जेजुरीला जाऊन आपल्या लाडक्या कुलदेवतेच्या चरणी माथा टेकवणार आहेत. मºहळकरांना तब्बल पाच वर्षांनंतर कुलदेवतेच्या दर्शनाचा योग आला आहे. यापूर्वी २००७ साली हजारो मºहळकर शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन व घरांना कुलूप लावून जेजुरीला गेले होते. त्यानंतर २०१३ व आता २०१८ साली हा योग मºहळकरांच्या वाट्याला आला आहे. मºहळकर जेजुरीच्या गडावर देवभेटीसाठी पोहचणार आहे त्या दिवशी माघ पौर्णिमा, चंपाषष्ठी, सोमवती, पौष पौर्णिमा अशा पैकी कोणताही दिवस नाही. जेजुरीच्या गडावर यात्रा भरणारा कोणताही दिवस नसताना तेथे पिवळ्याधमक भंडाºयाची उधळण व ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष होणार आहे तो फक्त मºहळकरांचा. मºहळ येथे जन्मलेल्या व्यक्तीला कुलदेवतेच्या देवभेठीसाठी जाण्याचा योग म्हणजे ‘जीवनाचे सार्थक’ असे समजले जाते. हा योग आलेला शनिवार (दि. १२) त्यांच्या चिरस्मरणात राहणारा ठरणार आहे. पूजाविधी आटोपून पालखी वाजतगाजत कडेपठारावर नेली जाईल. जेजुरी गडावर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होईल. मºहळचे ग्रामदैवत मूळ पिठाला भेटल्यानंतर मºहळहून जाणारे हजारो भाविक ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोष करीत दर्शनासाठी लोटांगण घालतील. देवभेटीचा अनुपम सोहळा मºहळकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे. गावातील ग्रामदैवत असलेला खंडोबा जोपर्यंत मूळपीठ असणाºया जेजुरीच्या खंडेरायाला भेटत नाही. तोपर्यंत या गावातील लोकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येत नाही. जेजुरी येथे यात्रा करून आल्यानंतर देहू दर्शन व मंगळवार (दि. १५) रोजी पांगरी मुक्काम होणार आहे. बुधवारी गावातून पालखी व कलश मिरवणूक होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. हा सहा दिवसांचा पालखी सोहळा संपूर्ण परिसरात चर्चेचा व कुुतुहलाचा विषय झाला आहे. मºहळकर खंडोबाचे लाडके भक्त आहेत. त्यामुळे त्यांनी गावात ग्रामदैवत असलेल्या खंडोबाचं मोठं मंदिर बांधले आहे.जनावरांची जबाबदारी पाहुण्यांची, तर गाव रक्षण पोलिसांकडे..या सहा दिवसांच्या काळात एकही गावकरी गावात थांबणार नसल्याने बाहेरगावच्या पाहुण्यांकडे गाय, बैल, शेळ्या, कोंबड्या अशा पाळीव प्राण्यांना सांभाळण्याची जबाबदारी राहणार आहे. तर गावच्या मालमत्तेची व घरांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात येणार आहे. यात्रेत बारा बलुतेदारांसह मुस्लीम समाजबांधवांची कुटुंबे सहभागी होणार आहेत. पूर्वीच्या बैलगाड्यांची जागा आता अद्ययावत वाहनांनी घेतली आहे. तर पालखी मिरवणुकीसाठी नवीन रथ मिळाला आहे.
आख्खं गाव निघाले जेजुरीला : तीन गावे बंद करून हजारो ग्रामस्थ जाणार खंडेरायाच्या दर्शनाला ! मºहळकरांचा देवभेटीचा आगळावेगळा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:12 AM
सिन्नर : एक.. दोन नव्हे तर तब्बल तीन गावांतील सुमारे सात हजार ग्रामस्थ घरांना कुलूप ठोकून येत्या शुक्रवारी (दि. ११) आपल्या लाडक्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी सहा दिवस गाव बंद करून जेजुरीला जाणार आहेत.
ठळक मुद्देआगळ्यावेगळ्या प्रथेमुळे देवभेटीचा हा अनुपम सोहळा विवाह सोहळ्यानंतर बहुतांश नवदांपत्य जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी