नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आरोग्य विद्यापीठासह सरकारही असंवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या साखळी आमरण उपोषणाला पाच दिवस उलटूले असून तीन महिला आंदोलकांच्या प्रकृतीत बिघाड होऊन त्या अत्यावस्थ झालेल्या आहेत. परंतु, तरीही विद्यापीठासह प्रशासन, लोकप्रतिनिधींसह सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून विद्यापीठाकडून सातत्याने खोटी विधाने करून आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन भारतीय ट्रेड युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कामगार संघटनेने समान काम समान वेतन द्यावे, निलंबीत कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजु करून घ्यावे व निर्माण होणाऱ्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आदि विविध मागण्यांसाठी 1 मे पासून आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलन स्थळावरून कर्मचाऱ्यांच्या वतीने कराड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शनिवारी (दि. 5) विद्यापीठ प्रशासनासह पालकमंत्री व राज्य सरकारला टिकेचे लक्ष केले. ते म्हणाले, कुलगपरू व कुलसचीव यांनी विद्यापीठातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विद्यापीठाने नव्हे, तर कंत्राटदाराने नियुक्ती केल्याचा खोटा दावा केला आहे. प्रत्यक्षात विद्यापीठाच्या वकीलाने औद्योगिक न्यायालयात कर्मचाऱ्यांचा मुख्य नियोक्ता विद्यापीठच असल्याचे प्रतिज्ञापत्र केले असल्याचे डॉ. कराड यांनी यावेळी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाच दिवस उलटून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर विद्यापीठ अथवा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली. या दरम्यान आंदोलकांमधील, तृप्ती जाधव, ज्योती पेखळे, प्राजक्ता वणीस या महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ज्योती पेखळे व प्राजक्ता वणीस यांची प्रकृती गंभीर असून अन्य उपोषण कर्त्यांचीही प्रकृती खालवत चालली आहे. असे असताना नाशिकचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना वारंवार आश्वासन देऊन भेट दिली नसल्याचे कराड यांनी सांगितले. यावेळी सिटूचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर देशपांडे, राज्य कर्मचारी नेत्या सुनंदा जरांडे,शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे मुकुंद दिक्षीत, सचिन मालेगावकर, अॅड. भूषण सातले आदिंसह कामगार कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रती आरोग्य विद्यापीठ असंवेदनशील, कराड यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 6:48 PM
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आरोग्य विद्यापीठासह सरकारही असंवेदनशील आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पुकारलेल्या साखळी आमरण उपोषणाला पाच दिवस उलटूले असून तीन महिला आंदोलकांच्या प्रकृतीत बिघाड होऊन त्या अत्यावस्थ झालेल्या आहेत. परंतु, तरीही विद्यापीठासह प्रशासन, लोकप्रतिनिधींसह सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून विद्यापीठाकडून सातत्याने खोटी विधाने करून आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन भारतीय ट्रेड युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केला आहे.
ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण पाचव्या दिवशी उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली तीन महिला कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालायात उपचार