नाशिक : शहर वाहतूक शाखेच्या वतीने नाशिकरोड परिसरात नो पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या दुचाकी टोर्इंग करून करण्यात येत असलेली अन्यायकारक कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.गेल्या पंधरवड्यापासून शहर वाहतूक शाखा युनिट ४ च्या वतीने नाशिकरोड परिसरातील नो पार्किंगच्या ठिकाणी व वाहतूकीला अडथळा होईल अशी उभी असलेली दुचाकी वाहने टोर्इंग करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. याबाबत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा व पोलीस प्रशासनाकडून वाहनधारकांना समजेल असे नो पार्किंगचे बोर्ड सर्वप्रथम लावण्यात यावे. वाहनधारकांमध्ये नो पार्किंग व वाहतुकीला अडथळा होण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, पोलीस प्रशासनाने मनपाकडून पार्किंगच्या जागा निश्चित करून घ्याव्यात त्यानंतर टोर्इंगची दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी कारवाई करावी, मात्र फक्त पैसे वसुलीसाठी गरज नसलेल्या ठिकाणी कारवाई करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर महानगरप्रमुख महेश बडवे, पूर्व विधानसभा प्रमुख नितीन चिडे, शिवाजी भोर, नितीन खर्जुल, श्याम खोले, योगेश देशमुख, समर्थ मुठाळ, अमित भगत, स्वप्नील औटे, सागर भोर, लकी ढोकणे, दीपक टावरे, विकास ढकोलिया, राजाभाऊ सोनवणे, ज्ञानेश्वर खालकर, संदीप मगर आदींच्या सह्या आहेत.टोर्इंग करणाऱ्या ठेकेदारांचे कामगार ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणीदेखील जाऊन विनाकारण दुचाकी उचलून दंडात्मक कारवाई करत आहे. तसेच दुचाकी टोर्इंग केल्यानंतर आपली दुचाकी न दिसल्यावर ती चोरीला गेली की काय यामुळे वाहनधारक तणावग्रस्त होतो.
वाहतूक शाखेकडून अन्यायकारक कारवाई होत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:43 AM