सारांशराजकारण्यांची जेव्हा अधिकची सक्रियता दिसून येते किंवा त्यासाठीची तयारी निदशर्नास येते तेव्हा त्यातून निवडणुकांचे संकेत घ्यायचे असतात. यंदाच्या दिवाळीत कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर वायुप्रदूषण टाळण्यासाठी फटाके न फोडण्याची मानसिकता सामान्य नागरिकांमध्ये दिसून येत असताना, राजकीय पातळीवर मात्र काही पक्षात दिवाळीनंतर चांगलेच फटाके फोडण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे तीदेखील या संकेताच्याच अनुषंगाने.
नाशिक महापालिकेच्या निवडणुका आणखी वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. स्वबळावर सत्ता मिळविलेल्या भाजपची चार वर्षे बोलता-बोलता निघून गेलीत. यात प्रारंभी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियमावर बोट ठेवून काम करण्याच्या पद्धतीमुळे काही काळ अडचणीचा गेला तर सध्याची पाच-सहा महिने कोरोनाच्या सावटात गेलीत. महापालिकेच्या तिजोरीची नादारी पाहता यापुढील वर्षभरही झिरो बजेटचा नारा देण्यात आल्याने फार काही प्रभावी काम करता येणे अशक्य दिसत आहे. या सा?र्या पाश्वर्भूमीवर आणखी वर्षभराने महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे, त्यामुळे कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडत सर्वच पक्षांमध्ये सक्रियता आढळून येणे स्वाभाविक ठरले आहे.
विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रारंभी महापौर आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून भाजपला जनता-जनादर्नापर्यंत नेण्याचे प्रयत्न आरंभिले होते; परंतु नंतर कोरोनामुळे त्यांना थांबावे लागले. आता जनता दरबारसारखा उपक्रम सुरू करून ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. पक्षाच्या नगरसेवकांचे आजवरच्या कामाचे प्रगतिपुस्तकही तयार करण्याचे सांगण्यात आले असून, पक्षपातळीवर भाजप कशी तयारीस लागली आहे हेच यातून दिसून यावे.
शिवसेनेच्या बाबतीत पक्षप्रमुखच मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने सत्तेच्या अनुषंगाने काही मर्यादा येणे समजताही यावे; परंतु केंद्रात असलेल्या सरकारसंदर्भात जनतेचे प्रश्न घेऊन समोर येण्यासाठी अनेक विषय असताना तसे घडून आलेले दिसले नाही. ह्यमनसेह्णत पूर्वीपासून मर्यादित मान्यवरांची चलती होती; परंतु अलीकडील भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी पक्षाचे पदाधिकारी व महापालिकेतील लोकप्रतिनिधी एकत्र आलेले पहावयास मिळाले.
राष्ट्रवादीत छगन भुजबळ स्थानिक असल्याने त्यांचे दौरे व बैठका सुरूच असतात त्यामुळे राष्ट्रवादीचे नाव व कामही लोकांपर्यंत पोहोचतच असते; पण खास महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या पक्षात तयारी सुरू झाल्याचे मात्र अद्याप दिसून येऊ शकलेले नाही. काँग्रेसचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. मध्यंतरी केंद्राच्या निणर्याविरोधात आंदोलनांनी चांगला जोर धरला होता; परंतु ती सक्रियता टिकून राहू शकलेली नाही. पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील व महापालिकेतील पक्षाचे नेते शाहू खैरे आदींमुळे पक्ष चर्चेत राहतो खरा; परंतु पक्ष पातळीवर स्थानिक नेतृत्वाची अनास्था दूर होऊ शकलेली नाही.
या सर्व पाश्वर्भूमीवर शिवसेना, मनसेने आतापासून चालवलेली महापालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी दिसून येणारी असून, शहर बससेवा, टीडीआर घोटाळा, स्मार्ट सिटी व भूसंपादनासह अन्य काही विषयांवर आतापासून झालेले आरोप-प्रत्यारोप पाहता दिवाळीनंतर या संदर्भाने राजकीय फटाके फुटण्याचेच संकेत म्हणता यावेत.राज्यातील सत्तेवरून भाजप शिवसेनेत बिनसले तेव्हापासून नाशिक महापालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांंना वेळोवेळी आडवे जाण्याचे प्रयत्न शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांकडून केले जात आहेत, त्यामुळे या संदर्भाने म्हणून जे घडते तीच व तेवढीच या पक्षाची सक्रियता म्हणता यावी. अजय बोरस्ते असोत, की विलास शिंदे, सुधाकर बडगुजर; महापालिकेच्या राजकारणात जे काही करतात तेवढेच पक्षाचे अस्तित्व दिसते. महापालिकेतील घडामोडींव्यतिरिक्त पक्ष म्हणून पक्षाचे पदाधिकारी फार काही करताना दिसत नाहीत. मागे महानगरप्रमुखपदी पक्षातील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यास संधी देऊन सांधेबदल केला गेला, परंतु त्यामुळेही काही नवीन घडून आलेले दिसले नाही.