नाशिक : घरात झोपलेल्या पाच व सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणा-या वडाळागावातील विकृत आरोपी हुजेफ रऊफ शेख (२० रा़ माळी गल्ली, वडाळागाव, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़२९) चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारवासाची शिक्षा ठोठावली़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी आठ साक्षीदार तपासून सबळ पुरावे सादर करून विकृती जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती़
वडाळागाव परिसरातील २४ सप्टेंबर २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास आई-वडिलांसमवेत सहा वर्षीय मुलगी घरात झोपलेली होती़ या घटना आरोपी शेख याने अनधिकृतपणे प्रवेश केला व सहा वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला़ मुलीच्या आई-वडिलांना जाग येताच त्यांनी शेखला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली व शेखची एक चप्पल घटनास्थळी राहून तो फरार झाला़ यानंतर त्याच्या आईवडिलांनी पीडित मुलीच्या आईवडिलांना भविष्यात त्याच्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही दिल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती़
वडाळागाव परिसरातील या घटनेस पाच दिवस उलटत नाही तोच २९ सप्टेंबरला २०१७ रोजी आरोपी हुजेफ शेख याने आणखी एका घरात झोपलेल्या सहा वर्षीय मुलीचे तोंड दाबून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी या मुलीच्या आईवडिलांना जाग आल्याने शेख फरार झाला़ या घटनांमुळे परिसरातील महिला व मुलींमध्ये शेखची दहशत निर्माण झाली होती़ अखेर नागरिकांनी पोलीस ठाणे गाठून शेखविरोधात तक्रारी केल्या तसेच प्रथम पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात शेखविरोधात विनयभंग व पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
प्रधान न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा तपास इंदिरानगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक एस़ ए़ बेल्हेकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकारी वकील कडवे यांनी पीडित मुली व त्यांचे आई-वडील असे आठ साक्षीदार तपासून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले तसेच विकृत शेख यास कठोर शिक्षेची मागणी केली होती़ विशेष म्हणजे दोन्ही पीडित मुलींनी शेख यास न्यायालयात ओळखत न घाबरता शेखविरोधात आपला जबाब नोंदविला़ या शिक्षेसाठी पैरवी अधिकारी एस़यूग़ोसावी, एल़बी़शेख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़