संशयित सरफराज पठाण हा १० मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास साईनाथनगर येथील न्यू मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये बळजबरीने मोबाईल, माईक घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याने आरडाओरड करीत गोंधळ घातला. फिर्यादी डॉक्टर जाकीर खान यांनी त्यास रोखण्याचा प्रयत्न केला असता संशयित पठाण याने त्यांना धक्काबुक्की केली, तसेच व्हिडिओ बनवून कारवाईची धमकी दिल्याची फिर्याद त्यांनी मुंबई नाका पोलिसांकडे दाखल केली होती. मात्र, गुन्हा दाखल होताच संशयित पठाण याने कारवाई टाळण्यासाठी पोलिसांना गुंगारा दिला. दरम्यान यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला. त्यामुळे संशयित पठाणच्या अटकेचा मार्ग खुला झाला. पोलीस त्याच्या मागावर असताना त्याने फेसबुक लाईव्हचा उद्योग सुरू ठेवला. त्यामुळे तपास पथकाने संशयित आरोपीचा माग काढून त्यास अटक केल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली. दरम्यान, हॉस्पिटल बाबत काही तक्रार असल्यास नागरिकांनी कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांची मदत घ्यायला हवी. तेथे जाऊन गोंधळ घालणे, फेसबुक लाईव्ह करून दबाव टाकणे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असेही ते म्हणाले.
डॉक्टरांना धक्काबुक्की प्रकरणी कथित पत्रकार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:12 AM