नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याबाबत भाजप-सेनेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या विद्यमान आमदारांबरोबरच इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.युतीकडून अशाप्रकारे दावा करताना त्याचा कोणताही ठोस पुरावा देण्यात आलेला नसल्यामुळे विरोधी पक्षांना प्रत्येक मतदारसंघ असुरक्षित वाटू लागला असून, आहे त्या जागा टिकविण्याचे मोठे आव्हान निवडणुकीपूर्वी इच्छुकांपुढे उभे ठाकले आहे. त्यामुळे काहींनी खासगी कंपन्यांमार्फत मतदारांचा कल जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून, विरोधकांच्या मानाने सत्ताधारी भाजप-सेनेने यात अधिक आघाडी घेतली आहे. पक्षपातळीवर मेळावे, बैठका, संभाव्य उमेदवारांची चाचपणी तसेच विरोधी पक्षांचे आमदार गळाला लावून त्यांनी आपली ताकद वाढविण्याचे सर्व प्रयत्न करतानाच विरोधी आघाडी खिळखिळी करण्यासाठी कधी आमदारांच्या पक्षांतराचे तर कधी राज्यातील २८८ पैकी २२० जागा जिंकण्याचा छातीठोक दावा करून स्वपक्षीयांची उमेद वाढविण्यात येत आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता, युतीला मतदारांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीकडून अनेकांनी उमेदवारी करण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधले असून, परिणामी विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, आघाडी समर्थकांकडून लोकसभेची निवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीतील विषय, मतदारांची मानसिकता यात मोठा फरक असल्याचे सांगून मतदार आघाडीला कौल देतील, असा दावा केला जात आहे. शिवाय युतीकडून २२० जागा जिंकण्याच्या केल्या जात असलेल्या दाव्यातील तथ्य काय असा सवालही विचारला जात आहे. असे असले तरी, आघाडीच्या उमेदवारांमध्ये काही प्रमाणात निवडणुकीची धडकी भरली असून, त्यासाठी मतदारांची चाचपणी करण्यासाठी काहींनी खासगी कंपनीचा आधारघेतला आहे.आपापली जागा ताब्यात ठेवण्याची कसरतयुतीच्या या दाव्यामुळे मात्र नाशिक जिल्ह्यातील जागांबाबतही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. युतीने केलेल्या दाव्यात नाशिकच्या किती जागा वाढतील हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी, सध्या युतीच्या ताब्यात जिल्ह्यातील आठ जागा आहेत. या जागा वाढतील असे युती समर्थकांचे म्हणणे असून, सहा जागांवर कॉँग्रेस आघाडी व एक जागा मित्रपक्ष माकपाच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला आपापली जागा ताब्यात ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे़
युतीच्या दाव्याने आघाडीच्या उमेदवारांमध्ये चलबिचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:50 AM