नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महिला व बालकल्याण समिती सभापती सुजाता भगत यांच्या हस्ते पंडित दिनदयाळ प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पंडित दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या अन्नपूर्णा, ओजस्वी, शिवदीप, ओमसाई, आत्मा मलिक अशा एकूण ५ महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रयेकी १० हजार या जिजाई वस्ती स्तरीय संघ व अहिल्याबाई वस्ती स्तरीय संघास प्रत्येकी ५० हजारांचा फिरता निधी थेट बँक खात्यावर आरटीजीएसमार्फत वर्ग करण्यात आला. सदर निधी वितरीत झाल्याबद्दल बचतगटांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्रत्येक गटाने मिळून उद्योग व्यवसाय करावा व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावावा त्याकरिता योग्य ते सहकार्य नगरपरिषदेच्या माध्यमातून केले जाईल असे मुख्याधिकारी दुर्वास यांनी सांगितले. शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, सिन्नर यांच्या माध्यमातून महिलांचे बचत गट बांधणीचे कार्य चालू असून अभियान अंतर्गत १०० बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. सदर गटांचे ५ वस्ती स्तरीय व एक शहर स्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, अर्जुन भोळे, अनुराधा लोंढे, सोनाली लोणारे, वस्ती स्तरीय संघ व बचत गटांचे अध्यक्ष, सचिव व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिन्नर येथे पाच महिला बचत गटांना फिरत्या निधींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 5:49 PM