लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून मतदारांना घरोघरी जाऊन मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्याबरोबरच, सोमवारी मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणाऱ्या बुथवर कार्यकर्त्यांची नेमणूक करण्याची रविवारी धावपळ उडाली. मतदान केंद्राबाहेर शंभर मीटरच्या बाहेरच बुथ लावण्याची अनुमती असल्याने पावसाचे सावट पाहता, अनेक मतदान केंद्राच्या बाहेर रात्री उशिरापर्यंत उमेदवारांचे बुथ उभारण्याचे काम सुरू होते.
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, प्रत्येक उमेदवाराकडून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मतदारसंघात कार्यकर्त्यांकरवी घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी विनंती केली जात आहे. अखेरचे काही तास शिल्लक असल्याने रविवारी प्रत्येक कार्यकर्त्यांला आपापल्या भागातील मतदारांच्या मतदान चिठ्ठ्या वाटपाचे काम सोपविण्यात आले तर उमेदवारांच्या संपर्क कार्यालयात मतदार यादीवर अखेरचा हात फिरवून कोणत्या भागातील मतदारांपर्यंत पोहोचलो नाही याचा आढावा घेण्यात आला. तर काही उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून राजकीय डावपेच, व्यूहरचना आखण्यात आली. मतदानाचा टक्का वाढावा यासााठी निवडणूक यंत्रणेकडून मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप केले जात असले तरी, अनेक मतदारांचे पत्ते सापडत नसल्याचे पाहून काही ठिकाणी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची त्यासाठी मदत घेण्यात आली आहे. सोमवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावरदेखील बीएलओंच्या मदतीने मदत कक्ष सुरू करण्यात येणार असून, ज्या मतदारांना त्यांचे नाव सापडणार नाही, त्यांना या मतदान कक्षाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदान केंद्राबाहेर एक बुथ लावण्याची परवानगी निवडणूक यंत्रणेने दिली आहे. मात्र मतदान केंद्राच्या शंभर मीटर बाहेर हे केंद्र सुरू करता येईल, त्यासाठी एक टेबल व दोनच खुर्च्यांची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या केंद्रावर कोण प्रतिनिधी असेल याची जुळवाजुळव रविवारी सर्वच उमेदवारांकडून करण्यात आली, त्याचबरोबर या कार्यकर्त्यांच्या खाना-पानाच्या व्यवस्थेवरही अखेरचा हात फिरविण्यात आला. मतदान केंद्रात नेमावयाच्या प्रतिनिधींची यादी यापूर्वीच निवडणूक यंत्रणेला सादर करण्यात आल्याने त्यांचे ओळखपत्रे वाटप करण्यात आले. अशा प्रतिनिधींना त्या त्या मतदान केंद्रातील मतदारांची यादी ताब्यात देण्यात आली आहे. केंद्रावरील प्रतिनिधी दिवसभर मतदान केंद्रात राहणार असल्याने त्यांच्यासाठीही उमेदवारांकडून खाण्या-पिण्याची व्यवस्थेची तयारी केली गेली. एकूणच शासकीय यंत्रणेच्या सज्जतेबरोबरच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनीही मतदानाच्या दिवसाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.