नाशिक : सेंट्रल काैन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआय) आयुर्वेदाच्या पदव्युत्तर पदवीधारकांना शस्त्रक्रियेबाबतची मान्यता देण्यात आल्याच्या निषेधार्थ आयएमएच्या वतीने पुकारण्यात आलेला दिवसभराचा बंद यशस्वी ठरला. ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी शुक्रवारी दिवसभर त्यांचे काम बंद ठेवून निर्णयाला विरोध दर्शवत निषेध केला.
सीसीआयने २० नोव्हेंबरला जाहीर केलेल्या राजपत्रात मॉडर्न सायन्समधील ५८ शस्त्रक्रिया आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवीधारकांना करण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र त्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी आवश्यक असतानाही ती घेतली नाही. त्यामुळेच या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्तरावर आयएमएच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता. त्याला नाशिक आयएमएच्या सभासद २ हजार डॉक्टर्सनी प्रतिसाद देत शुक्रवारचा बंद यशस्वी केला. सकाळी ६ ते सायंकाळी ६ या बंदच्या वेळेत ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी त्यांचे सर्व दवाखाने, बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून निषेध नोंदवला. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो, हे दाखविण्यासाठीच हा लाक्षणिक बंद होता. त्यामुळे आयएमए नाशिक शाखेच्या वतीने अन्य कोणतेही आंदोलन किंवा निवेदन देण्यात आले नाही. शासकीय रुग्णालयांमध्येदेखील ॲलाेपॅथी डॉक्टरांनी शुक्रवारी सेवा दिली नव्हती. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्येदेखील केवळ बीएएमएस डॉक्टरांची सेवा दिली. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील सेवेवरदेखील परिणाम झाला होता. दरम्यान, ॲलोपॅथी डॉक्टरांचा हा बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचे आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांनी सांगितले.
इन्फो
राज्यभरातील ३४ संघटनांचा पाठिंबा
नाशिक आयएमएच्या २ हजारहून अधिक सदस्य डॉक्टरांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला होता. तसेच राज्यभरातील आयएमएच्या ३४ संघटनांचा पाठिंबा लाभला होता. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याने रुग्णसेवेवरदेखील परिणाम झाला होता.