याबाबत आयमाचे माजी अध्यक्ष, उद्योजक धनंजय बेळे व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मुख्य समन्वयक सह. जिल्हाधिकारी नाडे आदींची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली. मध्यंतरीच्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये मेडिकल ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा तात्पुरता बंद केला होता तसेच प्रशासनाने उद्योजकांचे सिलिंडरसुद्धा मेडिकल वापरासाठी जमा केले होते. आता शहरातली कोरोनाची परिस्थिती बर्यापैकी पूर्वपदावर आली असून, विविध उद्योगातसुद्धा ऑक्सिजनचा वापर अत्यावश्यक ठरतो. त्यामुळे औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन वायू वापराची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सकारात्मकता दर्शवत संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी आयमाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ व सरचिटणीस ललित बूब उपस्थित होते.
कोट..
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत उद्योजकांना गरजेच्या शंभर टक्के ऑक्सिजन मिळण्याची परिस्थिती नाही. मात्र टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वापराची शासनाने परवानगी द्यावी.
धनंजय बेळे, अध्यक्ष, आयमा विश्वस्त मंडळ