लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ओझर येथील विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची अखेर नागरी उड्डाण मंत्रालयाने अनुमती दिली असून, त्यामुळे ओझर येथून रात्री येण्या-जाण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईला पर्याय म्हणून ओझर येथे विमाने रात्रीची मुक्कामीदेखील थांबू शकणार आहेत.
मुंबई विमानतळाच्या मर्यादा लक्षात घेता विविध कंपन्यांच्या विमानांना ओझर विमानतळावर रात्रीच्या लॅँडिंगसाठी परवानगी मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न चालविले होते. अशी परवानगी मिळाल्यास ओझर विमानतळाचा व्यावसायिक वापर सुलभ होण्याबरोबरच हवाई सेवेला चालना मिळण्याची शक्यता असल्याची बाब केंद्र शासनाच्या नागरी उड्डान मंत्रालयाला पटवून देण्यात अखेर यश आल्याने या संदर्भातील जाचक नियम शिथिल करत बुधवारी मंत्रालयाने ओझर विमानतळावर विमान कंपन्यांना रात्रीच्या लॅँडिंगसाठी परवानगी दिली आहे. यामुळे देशातील विमान कंपन्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, केंद्राच्या या निर्णयामुळे आता यापुढे ओझर विमानतळावर रात्रीही प्रवासी विमाने उतरण्याची सुविधा निर्माण झाली आहे.केंद्र सरकारने २००८ पासून लढावू विमानांसाठीच ओझर विमानतळावर रात्रीच्या लॅँडिंगला परवानगी दिलेली होती. परिणामी फक्त लढावू विमानेच रात्रीच्या वेळी ओझर विमानतळावर उतरत असे. लढावू विमानांप्रमाणेच प्रवासी विमानांनाही रात्रीच्या वेळी ओझर विमानतळावर उतरण्यास परवानगी द्यावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. ओझर विमानतळावर सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, विमानतळावर रात्री विमान उतरविण्यास परवानगी मिळाल्यास नाशिक-गोवा विमानसेवा सुरू करण्याची तयारी काही महिन्यांपासून स्पाईस जेट कंपनीने दर्शविली होती. केंद्राच्या या निर्णयामुळे ओझर विमानतळावरील विमानसेवेला मोठी चालना मिळणार असून, जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील हवाई प्रवाशांना मोठा लाभ मिळणार असल्याची प्रतिक्रिया खासदार गोडसे यांनी व्यक्त केली.