नाशिक रोड : शिक्षेसंबंधित शासकीय अभिलेखातील नोंदींमध्ये फेरफार करत बंदींना कारागृहातून मुदतीपूर्वीच सुटकेचा मार्ग ‘खुला’ करून देणे दोन तुरुंगाधिकाऱ्यांसह लिपिकांना भोवले. मध्यवर्ती कारागृहातील तिघा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कार्यरत तत्कालीन दोन तुरुंगाधिकारी आणि एका कार्यालयीन लिपिकाने शिक्षाबंदींच्या शिक्षेसंबंधीच्या शासकीय अभिलेखातील नोंदीमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड केली. तसेच न्यायाधीन कालावधीमध्ये वाढ करून, बाह्य दिवसांचा कालावधी घटविला आणि माफीचा कालावधी वाढवून बंदींना मुदतीपूर्वीच कारागृहातून बेकायदेशीरपणे मुक्त होण्यासाठी मदत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तुरुंग अधिकारी श्यामराव आश्रुबा गीते (श्रेणी-१), माधव कामाजी खैरगे (श्रेणी-२) आणि लिपिक सुरेश जयराम डाबेराव हे या प्रकरणात दोषी आढळले आहेत.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील न्याय विभागाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतीश गायकवाड यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या तिघांपैकी माधव खैरगे हे सध्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे कार्यरत आहेत. तसेच लिपिक सुरेश डाबेराव हे जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेमणुकीस आहेत. हा सर्व प्रकार जानेवारी २०२० पूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घडल्याचे उघडकीस आले आहे.
---इन्फो----
या बंदींच्या अभिलेखातील नोंदींवर लावले व्हाईटनर
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या हरी राजलिंगम गुटूका याच्या विषयीच्या अभिलेखातील न्यायाधीन कालावधी, बाह्य दिवस कालावधी, माफीचे दिवस या नोंदींवर व्हाईटनर लावून खाडाखोड केल्याची बाब संचित विभागाचे तुरुंग अधिकारी कृष्णा चौधरी यांच्या जानेवारी २०२० मध्ये निदर्शनास आली होती. असाच प्रकार याच कारागृहातील व्यंकट राम लुव्यक आणि विलास बाबू शिर्के या शिक्षा बंदींच्या अभिलेखातील नोंदीतही आढळून आला होता.
---इन्फो---
दोन वर्षांपासून सुरू होती चौकशी
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यांनी कारागृह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तुरुंग अधिकारी संपत आढे (श्रेणी-१) यांना चौकशी अधिकारी नेमले होते. या चौकशीत हा सर्व प्रकार निष्पन्न झाला. त्याविषयीचा अहवाल मध्य कारागृह विभाग औरंगाबाद, उपमहाकारागृह निरीक्षक, राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांना सादर करण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार संशयित श्यामराव आश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे आणि सुरेश जयराम डाबेराव या तिघांना निलंबित करण्यात आले आहे.