सटाणा : अडतमुक्त धोरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंदमुळे तब्बल सव्वा महिन्यापासून बाजार समित्या बंद असून, गोणी लिलावाबाबत अद्याप स्पष्टपणे निर्देश बाजार समित्यांना न दिल्याने अशा परिस्थिती सरकारचे मौन, विरोधकांची बघ्याची भूमिका यामुळे कांदा उत्पादकपुरता एकाकी पडल्याचे चित्र आहे. समित्या बंदमुळे साठवलेला कांदा सडू लागला असून, काहींचे वजन घटू लागले आहे. आधीच मातीमोल भाव असेला कांदा त्यात तो सडू लागल्याने तो निवडण्यासाठी लागणारी मजुरी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन निघाल्याचा दावा कृषी यंत्रणेने केला असला तरी, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे लागवडीच्या ३५ टक्के कांदापीक अक्षरश: अर्धवट सोडून द्यावे लागले आहे. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट, पंचेचाळीस अंशापर्यंत चढलेला पारा यामुळे उर्वरित कांदा साठवणक्षम आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असताना या बंदमुळे साठवलेला कांदा मोठ्याप्रमाणात सडू लागल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण, चांदवड, निफाड, सिन्नर, दिंडोरी, येवला व नाशिक हे तालुके उन्हाळ कांद्याच्या लागवडीत अव्वल स्थानावर मानली जातात. खाण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या नाशिकच्या कांद्याला देशाबरोबरच परदेशातही चांगली मागणी असते. राज्यात उन्हाळ कांदा उत्पादनात चाळीस टक्के कांदा नाशिक जिल्हा पिकवितो. यंदा कसमादे पट्ट्यासह सिन्नर, येवला, चांदवड भागात तेल्याचे दीर्घकाळ आक्रमण, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे डाळींब क्षेत्रात सुमारे साठ टक्क्यांनी घट झाली आहे. याच क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड होऊनही सलगच्या दुष्काळामुळे बहुतांश भागातील विहिरींनी जानेवारी अखेरीसच तळ गाठल्याने लागवड क्षेत्रावरील सुमारे पस्तीस टक्के कांदा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली, तर उर्वरित क्षेत्रावरील कांदापीक जोमात असताना प्रचंड तपमान व त्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या फेऱ्यात सापडल्याने ते पीक जरी निघाले असले तरी ते साठवणक्षम नसल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले. तरीदेखील कृषी विभागाने लागवड क्षेत्र गृहीत धरून यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन आल्याचा कागदोपत्री अहवाल सादर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे आजच्या घडीला दिसून येत आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात कांदा उत्पादक एकाकी
By admin | Published: August 08, 2016 10:10 PM