येथील उर्दू मीडिया सेंटरमध्ये मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी डिग्नीटी यांनी सांगितले, नागरीक मनपा आयुक्त दिपक कासार यांच्या कामकाजाबाबत असमाधानी आहे. गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून शहराची अवस्था खराब झाली आहे. आयुक्त कासार चुकीची धोरणे अवलंबित आहेत. शहर हिताचे निर्णय न घेता मनपा आर्थिक डबघाईस येईल, असे निर्णय घेतले जात आहे. सत्ताधारी कॉंग्रेस, सेना महापालिका आयुक्तांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव महासभेत आणत असेल तर जनता दल अविश्वास ठराव प्रस्तावाच्या बाजूने राहील, असे नगरसेवक डिग्नीटी यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त कासार यांच्याविरोधात नगरसेवकांकडून अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस व महागठबंधन आघाडी, जनता दल या पक्षांमध्ये कट्टर वैरभाव असला तरी आयुक्तांवरील अविश्वासाच्या प्रस्तावावर एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत्तारूढ कॉंग्रेस आघाडीमधील शिवसेनेची भूमिका स्पष्ट नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मुस्तकिम डिग्नटी यांनी आयुक्त कासार हे एक - दोन दिवसच कार्यालयात येतात. पदाधिकाऱ्यांना भेटत नाही. वॉटरग्रेसचा ठेका तसेच गिरणा पंपींग स्टेशनवरील पंप दुरुस्तीचे कोट्यवधीचे काम वादग्रस्त ठरले आहे, असा आरोपही मुस्तकिम डिग्नीटी यांनी केला.
आयुक्तांवरील अविश्वास ठरावासाठी जनतादलही सोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:16 AM