वातावरण ढवळले : महापौरांच्या दौऱ्यात प्रशासन धारेवर, शिवसेनेकडून ‘बिटको’चे पितळ उघडे
नाशिक : शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूने धुमाकूळ घातला असून, अनेकांचे बळी गेल्याने महापालिकेवर टीका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आता महापौरांनी पहिल्याच दिवशी प्रभाग दौºयात काढलेले प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे, शिवसेनेने बिटको रुग्णालयातील गलथान कारभाराची केलेली पोलखोल आणि मनसेने महापौरांना दिलेला अल्टिमेटम या पार्श्वभूमीवर महापालिकेतील राजकारण आता आरोग्य व्यवस्थेवर तापले आहे. त्यात सत्तारूढ पक्षावर विरोधक आणि सत्तारूढ पक्षाकडून तुकाराम मुंढे टार्गेट केले गेले असून, पालिकावर्तुळातील वातावरण ढवळून निघाले आहे. नाशिक : शहरात पसरलेल्या रोगराईमुळे भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देतानाच राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, महापौर रंजना भानसी यांनी प्रभाग दौºयाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या टापटीप कारभाराचा फोलपणा उघड केला.नाशिकरोड येथील सिन्नर फाटा रुग्णालय, एक शाळा आणि स्मशान भूमीला भेट दिल्यानंतर राजीव गांधी भवनात प्रशासनाच्या बैठका आणि प्रत्यक्षात होणारे निर्णय याचा वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नसल्याचे दौºयात उघड झाल्याचे सांगत आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नामोल्लेख न घेता शरसंधान केले. शहरातील निर्माण झालेल्या रोगराईस प्रशासनच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.गेल्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्ते दुरुस्तीच्या काही प्रभागांपुरता सादर केलेल्या प्रस्तावावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीकेची झोड उठवत आमच्या प्रभागात येऊन बघा असे आव्हान आयुक्तांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी,आयुक्तांचा वॉक विथ कमिशनर फोल झाल्याचा ठपका ठेवत आता आपणच प्रभागाप्रभागात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारी (दि.४) प्रभाग १९ व २२ मधील निवडक भागांना भेटी दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनात केवळ अधिकाºयांच्या बैठका घेऊन आणि आदेश सोडून काहीही होत नाही प्रत्यक्ष काय चालू आहे हे तेथेच जाऊन बघावे लागते, असा टोला मुंढे यांना लगावला.सिन्नर फाटा रुग्णालयातील अवस्था बिकट असून अस्वच्छता आहे, रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही, डॉक्टर गायब असतात, रुग्णांना पुरेशी औषधे नाहीत असे सांगतानाच महापौरांनी याच भागातील मनपा शाळेत तर अस्वच्छ जागी म्हणजे शौचालयाजवळ केवळ विद्यार्थ्यांसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था असून, अशावेळी विद्यार्थी आजारी पडणार नाही तर काय होणार असा प्रश्न त्यांनी केला. कामकाज सुधारण्यासाठी तसेच दुरुस्ती आणि अन्य स्वरूपाचे आदेश अधिकाºयांना देण्यात आले असून, त्यात कुुचराई केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.रुग्णालय चोवीस तास महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये चोवीस तास खुली राहातील आणि लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये डॉक्टर उपलब्ध करून द्यावे, असे आदेश महापौर भानसी यांनी प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांना दिले आहेत. याशिवाय सहाही विभागात मोफत रक्त आणि लघवी तपासणीची सोय करण्याचे आदेश दिले असून, शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे कडक आदेश दिले आहेत.