नाशिक : शहरात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे काही भागांत होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. जेलरोड व जुने नाशिकच्या काही भागांत गेल्या आठवड्यापासून अशुद्ध व तांबूस रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याने आराेग्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या परिसरात महापालिकेने त्वरित उपाययोजना करून सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. काही भागांत पाणीपुरवठा अनियमित तसेच दुर्गंधीयुक्त होत असल्याने नागरिकांमध्ये पोटदुखी, जुलाब व उलट्या यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जुने नाशिक परिसरातही असाच गढूळ पाणीपुरवठा केला जात हाेता. या आठवड्यातही बागवानपुरा, काझी गढी, अमरधामरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्मार्ट सिटीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पिण्याची जलवाहिनीच तुटल्याने या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर तातडीने निर्णय घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पाणीपुरवठा बंद पडणे, दूषित पाणीपुरवठा होणे, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होणे अशा विविध तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.